* समाजोपयोगी उपक्रमांनी कै. गुंगा बाळू पाटील यांना नेर्लेत भावपूर्ण श्रद्धांजली; शालोपयोगी साहित्य, वृक्ष आणि गणवेशांचे वाटप* फुलेवाडी वार...
*समाजोपयोगी उपक्रमांनी कै. गुंगा बाळू पाटील यांना नेर्लेत भावपूर्ण श्रद्धांजली; शालोपयोगी साहित्य, वृक्ष आणि गणवेशांचे वाटप*
फुलेवाडी वार्ताहर: नारायण लोहार
शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले येथील सामाजिक कार्याचे भान जपणारे ज्येष्ठ नागरिक कै. गुंगा बाळू पाटील यांच्या उत्तर कार्यानिमित्त निरर्थक कर्मकांडाला फाटा देत विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे चिरंजीव संदीप पाटील यांनी पुढाकार घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवला. या प्रसंगी नेर्ले येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, शिवारे-माणगाव येथील माध्यमिक विद्यालयातील गरजूंना गणवेश तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांना वृक्षवाटप करण्यात आले.
उत्तर कार्याचे औचित्य साधून संदीप पाटील व पाटील परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेर्ले येथील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
त्याचप्रमाणे, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ग्रामस्थ व उपस्थितांना विविध प्रकारच्या फळझाडांच्या व औषधी वनस्पतींच्या रोपांचे (वृक्ष) वाटप करण्यात आले. उपस्थितांनी ही रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, शिवारे - माणगाव येथील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला मोठा हातभार लागणार आहे.
"आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पश्चात अनावश्यक खर्च टाळून समाजातील घटक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरते. संदीप पाटील व त्यांच्या परिवाराने राबवलेला हा उपक्रम इतर समाजासाठी नक्कीच दिशादर्शक आणि अनुकरणीय आहे," असे प्रतिपादन उपस्थितांनी केले.कै.गुंगा बाळा पाटील हे मुंबई येथे नोकरीला होते.नेर्ले गावातील सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून त्यांचे चिरंजीव संदिप गुंगा पाटील यांनी स्तुत्य उपक्रम राबवला.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. संदीप पाटील यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल संपूर्ण परिसरातून विशेष कौतुक होत आहे.


No comments