नितवडे हद्दीत वन्यप्राणी सशाची शिकार; दोघांना अटक करडवाडी प्रतिनिधी गारगोटी वनपरिक्षेत्रातील निवतडे राखीव वनक्षेत्रात संरक्षित वन्यप्रा...
नितवडे हद्दीत वन्यप्राणी सशाची शिकार; दोघांना अटक
करडवाडी प्रतिनिधी
गारगोटी वनपरिक्षेत्रातील निवतडे राखीव वनक्षेत्रात संरक्षित वन्यप्राणी सशाची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवतडे जंगल कक्ष क्रमांक ३२१ मध्ये गस्त घालत असताना वनाधिकाऱ्यांना दुचाकीवरून संशयास्पदरीत्या जात असलेले दोन जण दिसले. वन कर्मचाऱ्यांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाठलागादरम्यान त्यांनी गावठी बनावटीची बंदूक व एक पिशवी फेकून दिली. वन कर्मचाऱ्यांनी ती जप्त केली असता पिशवीमध्ये एक चामडी व आतडी काढलेल्या मृत सशाचा अवशेष आढळून आला आहे.
चौकशीदरम्यान संबंधितांनी गावठी बंदुकीच्या साहाय्याने सशाची शिकार केल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेला ससा हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची-१ (Schedule-I) मध्ये समाविष्ट असलेला संरक्षित हिस्पिड हेअर (Hispid Hare – Caprolagus hispidus) असल्याचे वन विभागाने सांगितले.
या प्रकरणी ओंकार चंद्रकांत पाटील (वय २७) व राजेंद्र मारुती पाटील (वय ३४, दोघेही रा. निवतडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. धैर्यशील पाटील, उप वनसंरक्षक कोल्हापुर वन विभाग कोल्हापुर, वि.र. काळे सहा. वनसंरक्षक (खा. कु.तो व वन्यजीव) कोल्हापुर वन विभाग कोल्हापुर, यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश तायनाक वन परिक्षेत्र अधिकारी गारगोटी, श्री. राजेश चौगुले, वनपरिक्षेत्र अधिकारी कडगांव बळवंत नानु शिंदे वनपाल गारगोटी, मधुकर काशिद वनपाल कुर, संजय चौगले वनरक्षक नितवडे, नितीन शिंदे वनरक्षक कुर, संतोष गोजारे, वनरक्षक गारगोटी, कु. निकीता चाळक वनरक्षक शेणगाव, सदाशिव तांबेकर वनरक्षक वेंगरुळ, उत्तमकुमार कांबळे, वनरक्षक मिणचे, श्रीमती सारीका बेडगे, वनरक्षक आंबवणे, दत्तात्रय होनमाने, वनरक्षक कडगांव, गणेश कदम, वनरक्षक कोंडोशी, बाबुराव आडळ, वनरक्षक कारीवडे व वनसेवक तसेच RRT सदस्य तसेच गारगोटी, कडगांव अधिकरी/कर्मचारी यांनी केली असुन पुढील तपास चालु आहे.

No comments