99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार सा...
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड
फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार
सातारा येथे होणाऱ्या 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड झाल्याची बातमी दूरदर्शनवर झळकली आणि नेर्ले गावातील लहान थोरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विश्वास पाटील यांचा जन्म28 नोव्हेंबर 1959 रोजी नेर्ले(वारणा) ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांचे राहणीमान साध्या पद्धतीचेच होते. लहानपणापासूनच त्यांना वारणा नदीतील मासे पकडणे, मनमुराद पोहणे, ओढ्याचे खेकडे पकडणे, तमाशा पाहणे, कुस्ती व खेळही आवडायचे.त्यांचे वडील महिपती ईश्वरा पाटील हे नेर्ले गावचे उपसरपंच त्यामुळे राजकारणाची ही त्यांना आवड होती.त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर नेर्ले येथे झाले. त्यांना प्राथमिक शाळेत श्रीपती विठ्ठल आपटे, नामदेव पांडुरंग कांबळे, सहदेव महादेव पाटील, अत्रीचे पाटील गुरुजी असे नामवंत शिक्षक लाभले. या गुरुजनांना विश्वास पाटील कधीही विसरले नाहीत. वर्षातून एकदा तरी या गुरुजनांना ते भेटायला जायचे.8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण यशवंत माध्यमिक विद्यालय कोकरूड येथे झाले.11वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषय घेऊन एम ए पूर्ण केले. तसेच कायद्याची पदवी संपादन केली. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात शिक्षण घेत असताना केली होती. पदवी शिक्षण घेत असताना कथाकथन करण्यास सुरुवात केली.
1983 साली ते एमपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. उपजिल्हाधिकारी पदासाठी ते पात्र झाले. त्यांच्या नोकरीची सुरुवात पुनर्वसन अधिकारी म्हणून सातारा येथे नियुक्ती झाली. विश्वास पाटील यांच्या नोकरीची सुरुवात ज्या सातारा जिल्ह्यात झाली त्याच जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवण्याचा सन्मान त्यांना मिळाला. जणू काही दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. पुनर्वसन अधिकारी असताना धरणग्रस्तांच्या व्यथा काय असतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. यातूनच त्यांनी झाडाझडती ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी मराठी भाषेबरोबर इंग्रजी, आसामी या भाषेत प्रकाशित झाली. तसेच काही कादंबऱ्या हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषेत प्रकाशित झाल्या.
जिल्हाधिकारी पदी बढती मिळाल्यावर फिल्म सिटी मुंबई येथे व्यवस्थापक संचालक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. त्यांच्या पांगिरा व चंद्रमुखी या कादंबरीवर चित्रपट निर्मिती झाली. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम 14 महिन्यात पूर्ण केले.
त्याचबरोबर आपल्या जन्मभूमी नेर्ले गावातील साताळी देवीचा रस्ता हिंदी चित्रपट अभिनेत्री तत्कालीन खासदार हेमा मालिनी यांच्या फंडातून करण्यात आला.
बालपणापासूनच तमाशाची आवड असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी टीव्हीवरील लावणी स्पर्धेचे परीक्षण हे केले. आपले चुलते गणपती पाटील यांच्याबरोबर कोकरूड या ठिकाणी तमाशा पाहायला जायचे.विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या इतर देशांमध्ये सुद्धा प्रकाशित झाल्या. यावरूनच त्यांच्या साहित्याचा दर्जा किती महत्त्वाचा होता हे दिसून येते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नेर्ले गावाबरोबर शाहुवाडी तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना फार मोठा आनंद झालेला आहे. एका शेतकरी कुटुंबात व ग्रामीण भागातील जन्माला आलेल्या लेखकाला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला हे नसे थोडके.
विश्वास पाटील यांची साहित्य संपदा
1) आंबी-1980
2) कलाल चौक-1982
3) क्रांतीसुर्य-1986
4) चलो दिल्ली-1986
5) पानिपत-1988
6) पांगिरा,-1990
7) झाडाझडती-1991
8) महानायक 1998
9) रणांगण-1999
10) चंद्रमुखी-2004
11) संभाजी-2005
12) नॉट गॉन विथ द विंड
,2008
13) लस्ट फाॅर लालबाग-2015
14) नागकेशर-2019
15) गाभुळलेल्या चंदबनात
2020
16) अण्णाभाऊ साठे दर्दभरी
दास्तान-2021
17) महासम्राट(झंजावात -1व
रणखैदळ-2 ) 2022
याचबरोबर बंदा रुपया, गाॅंधी-गीता, पूर्णवाद व गांधी चिंतन, कार्ल मार्क्स व्यक्ती आणि विचार, झुंडीचे मानसशास्त्र, फ्रेडरिख नीत्शे जीवन आणि तत्त्वज्ञान.
2019 रोजी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे 23 भारतीय भाषांच्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.
विश्वास पाटील यांना मिळालेले विविध पुरस्कार
1) झाडाझडती कादंबरी-साहित्य अकादमी पुरस्कार (1992), विखे पाटील पुरस्कार,(1990) प्रियदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार,(1990)
2) पानिपत कादंबरी-नाथ माधव पुरस्कार(1980) भारतीय भाषा परिषद पुरस्कार (1990)
3) महानायक कादंबरी-गडकरी पुरस्कार (1998) राज्य सरकारचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार
4) पांगिरा कादंबरी-राज्य सरकारचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार
5) एकूण साहित्य-इंदिरा गांधी गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार(2020)
6) लस्ट फॉर लालबाग-लोकमंगल सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार
तसेच गुडिया व ग्रेट कांचन सर्कस कादंबरी इ. साहित्य
एप्रिल 2023 रोजी अखिल भारतीय साहित्य अकादमी सदस्य पदी बिनविरोध निवड.
अशा या साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कार्यामुळे विश्वास पाटील देशातच नव्हे तर विदेशातही परिचित आहेत. त्यांनी ऐतिहासिक कादंबरी लिहिताना प्रत्यक्ष त्या स्थळांना भेट देऊनच लेखन केले आहे.यामुळे त्यांच्या संभाजी, महानायक, महासम्राट, क्रांतिसूर्य व पानिपत या कादंबऱ्या खूपच गाजल्याआहेत.
No comments