Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

राहुरी मध्ये रंगले श्रावण धारा काव्य संमेलन

 राहुरी मध्ये रंगले श्रावण धारा काव्य संमेलन श्रावणात इंद्रायणी मध्ये बरसल्या शब्दांच्या सरी अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-राहुरी ता...

 राहुरी मध्ये रंगले श्रावण धारा काव्य संमेलन



श्रावणात इंद्रायणी मध्ये बरसल्या शब्दांच्या सरी



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-राहुरी तालुक्यातील इंद्रायणी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या श्रावणधारा काव्य संमेलनाची बहारदार काव्य मैफिल अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये रंगली होती. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पाथर्डी चे ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरच्या ज्येष्ठ कवयित्री सुनिता ताई वाळुंज ह्या उपस्थित होत्या. यावेळी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष माननीय कवी होन सर , गीतकार बाबासाहेब पवार, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आनंदा साळवे, कवी गोरख पवार, कवी बाळासाहेब मुतोडे,ू दत्तात्रेय निर्मळ सर पंच बाळासाहेब पेरणे यांच्यासह नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर या जिल्ह्यातून कवी व कवयित्री मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून श्रावण महिन्यात कवितेच्या पावसामध्ये शब्दांच्या सरी धो धो कोसळल्या आणि इंद्रायणीच्या पात्रात आनंदाचा महापूर जणु ओसंडून वाहत होता. असे नयन रम्य दृश्य हृदयाला हे लावणारे या काव्य सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळाले. पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावचे रहिवासी कारभारी नरोडे व आशाबाई नरोडे यांना आदर्श मेंढपाळ हा पुरस्कार इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.


       कवी संमेलनाच्या प्रारंभी शेवगा वरून आलेले कवी प्रदीप बोडखे यांच्या शरीर संपत्ती या कवितेचे अप्रतिम सादरीकरण झाले. ते म्हणतात

    शरीर आपली मंदिर, व्यायामा नित्य करा

दैवत त्यातील मन, आराधना नित्य करा


या त्यांच्या ओळी शरीराचे महत्त्व आणि व्यायामाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करणाऱ्या होत्या. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवयित्री सुनिता वाळुंज म्हणाल्या

 अनामिक ही गोड नाती

जपावी काळजाच्या कुपीत

रक्ताच्या नात्याहून सरस

असे हे मैत्रीचं गुपित


रक्ताच्या नात्या पेक्षा भावनिक नाते संबंध बऱ्याचदा महत्त्वाचे असतात, मैत्रीची प्रार्थना करणाऱ्या या त्यांच्या काव्यपंक्तीने उपस्थित रसिकांच्या काळजाला त्या स्पर्श करून गेल्या त्यानंतर जेष्ठ कवी व कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर पत्र  नावाची कविता सादर केली व शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्या कवितेमधून अधोरेखित केल्या, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर आसूड ओढणारी ही कविता रसिक प्रेक्षकांना खूपच भावून गेली


सखे माझ्यामुळे आयुष्य तुझं

बेची राख होणार आहे

माझ्या नसण्याने तुझं असनही

नसल्यासारखं होणार आहे

आपल्या चिमुकल्या पाखरांना

चोचीमध्ये चारा तू घालीत जा

नाही मिळालं पाणी

तर डोळ्यातील दोन थेंब पाजीत जा

सखे वेळ आता संपली आहे

दोरी मानेवर आवळली आहे

तरी तुला स्मरतो आहे

मरता मरता सखे पत्र

अखेरचे लिहितो आहे


अशा पद्धतीने काळजाला हात घालणारी कविता त्यांनी सादर केली. यानंतर जेष्ठ कवी आत्माराम शेवाळे आपल्या कवितेतून म्हणतात


 बाप माझा बाप होता

 त्याचा जरी मला धाक होता

 तरी माझ्यासाठी तो गोड

साखरेचा पाक होता.

परमेश्वर स्वतः या पृथ्वीवर येऊ शकत नाही म्हणून त्याने आई आणि वडील यांच्या रूपाने या पृथ्वीवर त्यांना पाठवले आहे अशी वडिलांची महती सांगणारी त्यांची कविता कार्यक्रमाची उंची वाढून गेली.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होन सर यांनी श्रावण बाळ ही कविता सादर करून सभागृहात धमाल उडून दिली ते आपल्या कवितेत म्हणतात


चल चल चल सजनी

तू गळ्यात घातली माळ

लग्नाअधि ग सजनी

मी होतो श्रावण बाळ

आई बाप ग माझे

जशी विठ्ठल रखुमाई

गावाकडे चल तुला

दाखवीतो काळी आई


संयोजन समितीचे सदस्य कवी गोरख पवार म्हणाले


बाप माझा मोकळा

बाप घराचा आधार

बाप कष्टाचा हो फार

बाप जीवनाचा सार.


कवी रूपचंद शिदोरे यांनी श्रावणावर भाष्य करणारी एक सुंदर आणि श्रावणाचे महत्त्व सांगणारी श्रावण धारा ही कविता सादर केली.


पाथर्डी चे एकताचे अध्यक्ष शीघ्र कवी राजेंद्र उदारे यांनी ऑनलाइन जमान्यातील गेम या विषयावर भाष्य करणारी कविता सादर केली

ऑनलाइन गेम नको रे बाळा

खेळू नको गेम बाळा

बरा नाही हा चाळा


सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या आणि अमिश दाखवणाऱ्या गेम आणि वेळेचा होणारा अपवेय यावर भाष्य करणाऱ्या या ओळी वास्तवाचे दर्शन घडवतात. यानंतर नेवासे वरून आलेले कवी प्रवीण गवळी यांनी आपल्या प्रेम कवितेमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करत सये ही कविता सादर केली. तसेच नेवासा न्यायालयामध्ये कार्य करणारे एडवोकेट संजय माकोने यांनी म्हटले वरून आलेली कवयित्री आरती सोनवणे हिने


मेघसावळा श्रावण, बरसात पावसाळी

इंद्रधनुची कमान , सूर्यकिरण उधळी अशी श्रावणाचे विहंगरूप दर्शवणारी कविता पेश केली. यानंतर रमेश शिंदे आपल्या कवितेतून म्हणतात

अरे आभाळा आभाळा, थेंब कारे तू देईना

तहानलेल्या भूमातेची, कुस कारे भरीना

या कवीने पावसाला विनवणी केली आहे, तर संभाजीनगर येथून आलेले कवी रावसाहेब मते म्हणतात


येथे श्रावण बरसत बरसत

रंग लेवून हिरा

जणू नववधू नऊवारीत सजली

अवनी आमचा, वसुंधरा सुंदरा

यानंतर संगमनेरचा दमदार कवी आपल्या मिश्किल आणि कोपरखळ्यांनी प्रेक्षकांना मन मुराद हसवतो. तो म्हणतो


पावला पावलावर तिने

स्वतःची घर बसविले

देवालाच माहीत तिने

किती जणांना फसविले


यानंतर डॉक्टर विवेक वाकचौरे यांनी वास्तवाचे दर्शन घडवणारी एक रचना सादर केली ते म्हणतात

मातीत गाळायला अंगात, आता घाम नाही

रक्त आठवायला ढेकळीत, आता राम नाही.

यानंतर डॉक्टर बिनझीर शेख यांनी बदलणारी प्रेमाची चित्र आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडले


कित्येक कृष्णाच्या मनातील नरकासुराने

कित्येक राधांना नरका पुरात डांबलेले आहे

कृष्ण राधेच्या पवित्र प्रेमाला

इथेच कुठेतरी गालबोट लागलेली आहे.


अशा एकापेक्षा एक सरस काव्यरचनांनी श्रावणधारा काव्य संमेलनाची उंची वाढत गेली. या संमेलनामध्ये सुरेश वैरागर यांनी सुद्धा श्रावणात महत्त्व सांगणारी दमदार कविता सादर केली, तसेच जेष्ठ कवी ह भ प निवृत्ती महाराज कानवडे यांच्या कवितेने सभागृह दणाणून गेले. जुन्या पिढीतील व नव्या पिढीतील अंतर दाखवणारी कविता प्रेक्षकांना भावून गेली. या संमेलनामध्ये कवी किरण रोकडे, बाबासाहेब पवार, शेख ताई, रूपचंद शिदोरे, विलास शिंदे, मनीषा गायकवाड, रमेश शिंदे, तथागत रोकडे, पांडुरंग जाधव, ज्ञानदेव उंडे, डॉक्टर बाळासाहेब वाघुर वाघ यांच्या कवितेने  प्रेक्षकांमधून टाळ्यांची वसुली केली. तसेच राजेंद्र थोरात शिवशाहीर ओवी काळे व सामाजिक क्षेत्रातील व साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी रासकर सर यांनी केले.

No comments