स्त्री आणि पुरुष यांच्या समंजस भूमिकेतूनच कुटुंब व समाज सुखी होईल-: प्राचार्य टी.ई. शेळके अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- कष्टकरी आण...
स्त्री आणि पुरुष यांच्या समंजस भूमिकेतूनच कुटुंब व समाज सुखी होईल-: प्राचार्य टी.ई. शेळके अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- कष्टकरी आणि संसारी स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. कोणताही टोकाचा विचार घातक ठरतो. समाजात,संसारात स्त्री आणि पुरुष यांच्या समंजस भूमिकेतूनच कुटुंब व समाज सुखी होईल,असे विचार स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीरामपूर- नेवासा रोडवरील श्रीसाईदत्त रसवंती गृह , शेतीत कष्ट करणाऱ्या आणि चीप्स विक्रेत्या कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी प्राचार्य शेळके बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संबंधित महिलांशी जागतिक महिला दिन आणि कष्टकरी जीवन याविषयी चर्चा केली. त्यावेळी रसवंतीगृह चालविणाऱ्या सौ. सोनल सचिन खेडकर म्हणाल्या, आमचा असा सन्मान कोणी केला नाही, दिवसभर कष्ट करण्यात आम्ही आनंद मानतो. कुटुंबासाठी कष्ट करण्यात आम्ही समाधान मानतो. स्त्रीसबलीकरण असे पेपरमध्ये वाचतो पण आमच्या घरातील सर्व माणसे आम्हाला सन्मानानेच वागवितात, मुलांबाळांच्या हितासाठी झटणे आणि प्रामाणिक संसार करणे हाच आमचा आनंद आहे. शेतीत काम करणे आणि शेती बरोबर जोड व्यवसाय केला की संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो, मुलांमुलींचे शिक्षण करता येते, आम्हाला काम करताना आमच्या मुलांचे भविष्य दिसते, त्यात आनंद आहे. चिप्स विक्रेत्या सौ. कांचन संजय चव्हाण म्हणाल्या, जिथे मिळेल काम तेच आमचे देवाचे धाम, त्यामुळे आमचा सन्मान झाला, रस्त्यावर श्रमकरी महिलांचा कोण सन्मान करणार ? असे सांगून त्यांनी आम्ही कामात राम पाहतो असे सांगितले. कु.गौरी पोपटराव काळे म्हणाल्या, शेतीत कष्ट करणारे आमच्या परिवारातील पोपटराव काळे, नानासाहेब काळे, आजी, आजोबा सर्वच मनापासून कष्ट करतात म्हणून आम्ही डॉक्टर होण्याचा अभ्यास करतो, मुलींना सन्मानाने वागविणारे आमचे कुटुंब आम्हाला देवासमान आहे. असे सांगून त्यांनी कांचन चव्हाण, सोनल खेडकर, आरोही खेडकर यांना पुस्तके, भेटवस्तू देऊन सन्मानीत केले. आश्विनी काळे म्हणाल्या, आम्ही शिक्षण घेतो पण शिक्षणापासून दुरावलेल्या महिला यांचे फार मोठे कष्ट आहे, ते लक्षात घेतले पाहिजे.असे सांगून कष्टकरी महिलांचे कौतुक केले. प्राचार्य शेळके यांनी सर्व कष्टकरी परिवाराचे कौतुक केले. संजय चव्हाण, नानासाहेब काळे, बापूसाहेब खेडकर, अमोल नरवडे, आर्यन नरवडे यांनी आगळ्या वेगळ्या महिला सन्मान सोहळ्याचे कौतुक केले. अमोल नरवडे यांनी नियोजन करून आभार मानले.
No comments