शेतशिवारी पुस्तक मेळा,रमे साहित्यिक संवादसोहळा अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि विश्वलक्ष्मी ग्रा...
शेतशिवारी पुस्तक मेळा,रमे साहित्यिक संवादसोहळा
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे पुस्तके शेतशिवारी, शेतमळ्यात उपक्रमांचे आयोजन कोपरगाव येथील सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन रजिस्ट्रार विष्णू भगत यांनी त्यांच्या दिघी येथील शेतात आयोजित केला होता, त्यांचाही साहित्यिकांनी सन्मान केला. त्याप्रसंगी विविध साहित्यिक उपक्रमांनी वनपुस्तक परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कवितावाचन आणि अभिजात मराठी भाषा चर्चासह वनभोजन संपन्न झाले.
श्री विष्णू भगत, डॉ. देवेंद्र भगत यांनी सर्व साहित्यिकांचे स्वागत, सन्मान केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या' दिव्यत्वाचे चिंतन',' साहित्याचे दीपस्तंभ', डॉ. शिवाजी काळे संपादित' शब्दप्रेरणा', विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे लिखित' श्रमप्रतिष्ठा' आदी पुस्तकांवर मनमोकळा परिसंवाद झाला. विष्णू भगत म्हणाले, आमच्या दिघीसारख्या छोट्या खेड्यातल्या शेतवाडीत, शेतशिवारी साहित्यिकांचे आगमन होणे आणि पुस्तकांचा असा ज्ञानमेवा मिळणे ही दुर्लभ घटना आहे. सुखदेव सुकळे यांच्या श्रमप्रतिष्ठा या पुस्तकाचे खरे दर्शन आमच्या या शेतशिवारी दररोज होते पण आमच्या श्रमाची प्रतिष्ठा कोणी सांगितली नव्हती, ती वाचण्यास आणि ऐकण्यास मिळाली, हा अपूर्व आनंद आहे. डॉ. देवेंद्र भगत म्हणाले, डॉ. उपाध्ये यांच्या' दिव्यत्वाचे चिंतन' आम्ही दररोज अनेकांच्या शेतरानात, जनावरांच्या गोठ्यात अनुभवतो. जनावरांच्या जीवनातही आजार आणि आरोग्य प्रश्न खूप असतात. आमच्या शेतशिवारात पुस्तक मेळा होणे ही शब्दब्रह्माची प्रचिती आहे. माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी डॉ. शिवाजी काळे संपादित' शब्दप्रेरणा' पुस्तकात डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकावर अनेकांचे अभिप्राय वाचनीय आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हे कौतुकास्पद आहे, पण पुस्तके केवळ ग्रंथालयात आणि शाळा, कॉलेजात न राहता ती अशी शेतशिवारी कष्टकऱ्यांच्या शेताबांधावर नेली पाहिजे, जेथे न दिसे रवी, तेथे पोचे कवी तरच मराठी जनमनाची आस्था होईल, ते काम वाचन संस्कृती श्रीरामपूरात करीत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच विष्णू भगत हे रजिस्ट्रार पदावरून सेवानिवृत्त झाले, त्यांनी रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिक सेवा केली आणि चरित्र, चारित्र्य जपले, स्नेहबंधाने माणुसकीची पुण्याई प्राप्त केली, त्यामुळेच त्यांचे मन निर्मळ, कुटुंब सोज्वळ असल्याचे सांगून शेतशिवारी साहित्यिक उपक्रम घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी 'शब्दप्रेरणा' पुस्तकातील लेख व लेखकांचे कौतुक केले. या पुस्तकातील प्रा.रायभान दवंगे, स्मिताताई आव्हाड, अजय जोशी, डॉ.सदाशिव कदम, अर्जुन राऊत, पोपटराव पटारे, डॉ. दत्तात्रय गंधारे, डॉ.शिवाजी काळे, प्रा. विलासराव तुळे, संतोष लेंभे, डॉ. अविनाश जोशी, डॉ. शैलेजा यादवाड, डॉ. मदन सोमाणी, प्रा.सौ. मंजिरी सोमाणी, भाग्यश्री बडे, सुखदेव सुकळे, शरद थोरात इत्यादिंनी लिहिलेले लेख वाचनीय असल्याचे सांगून चर्चा केली. प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे यांनी डॉ. उपाध्ये यांच्या' साहित्याचे दीपस्तंभ' आजच्या विद्यार्थी व साहित्यिकांनी वाचावे असे आवाहन केले. सौ. शांताबाई विष्णू भगत, सौ. मनिषा देवेंद्र भगत, सौ. सुवर्णा महेंद्र भगत आणि भगत परिवाराने उपक्रमांचे सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. कचरू गंगाधर धुळगंड, जनार्दन वाल्मिक धुळगंड, सुजित गोकुळ लबडे आदिंनी या साहित्यिक गोतावळ्यात , शेतमळ्यात भाग घेतला. डॉ. देवेंद्र विष्णू भगत यांनी साहित्यिक आणि त्यांची पुस्तके शेतशिवारी येणे ही दुर्मिळ संस्कृती आहे. कृषी आणि ग्रंथ संस्कृतीचा आनंद मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. वनभोजन, रानमेव्याचा आस्वाद घेत हा पुस्तकमेळा संपन्न झाला.
No comments