Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बेलेवाडी काळम्मा चे आमचे पाटील कुटुंबीय .. त्याग, समर्पण यांचा स्नेहमय धागा

  बेलेवाडी काळम्मा चे आमचे पाटील कुटुंबीय .. त्याग, समर्पण यांचा स्नेहमय धागा     प्रा.सुषमा अरूण पाटील, जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन ...

 बेलेवाडी काळम्मा चे आमचे पाटील कुटुंबीय .. त्याग, समर्पण यांचा स्नेहमय धागा

    प्रा.सुषमा अरूण पाटील,

जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित,

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर .

फोन नंबर..९६८९१६६८६४





   कविवर्य वंदनीय कुशापराव पाटील (गुरुजी) अर्थात आमचे  काका यांच्या *गुलमोहर* या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने...

 आदरणीय काका,

**जीवनाच्या अमावस्येतील कोजागिरीचे चंद्र तुम्ही, गाव पांढरीचे गुरु तुम्ही, अंगाई चे सूर तुम्ही, गळफासाचे शब्दकाळ, रातव्याचे शिल्पकार तुम्ही, कथेच्या व्यथा तुम्ही ,कादंबरीची गाथा तुम्ही, सरस्वतीचे ज्ञानसागर, प्रतिभेचे तुम्ही कवी, चंद्रकलेची शब्द साधना, आज उजळली  नभी उंबरी, शांत आणि सात्विक वृत्ती लवलेश नाही गर्वाचा,निपाणीत होत आहे सन्मान या गुलमोहराचा...**


घर म्हणजे घरातील सदस्यांच्या अनेक विचारांचे, समस्यांचे, त्रुटींचे संमेलन म्हणजे घर होय. आपल्या सासऱ्यांच्या कवितांचा संग्रह एकत्र करून तो लिखित स्वरूपात प्रकाशित करणे ही कल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यात आली. त्या कविवर्याच्या स्नुषा व माझ्या बहिणीप्रमाणे असणा-या मावस जाऊबाई विजयानंद हाॅस्पिटल, निपाणी च्या ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ डॉ.शिल्पा पाटील होय.सासू सासरे हे नाते म्हणजे सध्याच्या काळात *सा* रख्या *सू* चना देणारी (सासू), नेहमी धाक,चुका दाखवणारे ,उणीवा काढणारे आहे असा सार्वत्रिक समज असताना या परिवारात ज्याप्रमाणे एखाद्या लेकीला वाटावे माझ्या सास-याच्या शब्दाला,कवितेला चिरकाल मूर्तरूप द्यावे ,यांचे श्रेय डॉ.शिल्पा पाटील यांच्या माहेरच्या संस्कारशील  परिवारास जाते.परवा जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय  क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ प्रसंगी  सूत्रसंचालन माझ्या कडे होते.त्यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक व पंचायत समिती कागलचे केंद्रप्रमुख मा. एस.व्ही पाटील सर (सडोली खालसा) त्या कार्यक्रम प्रसंगी म्हणाले की, *"मॅडम छान बोलता, कुठून प्रेरणा घेतली ही!"* हे ऐकून मी म्हणाले, "माझे जन्मदाते आई -वडील, माझ्या सासरची मंडळी व काळम्मा बेलेवाडी चे आदर्शवत  असणारे पाटील कुटुंब ... भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष व आमच्या एम.आर. हायस्कूल व जुनिअर कॉलेज गडहिंग्लज चे माजी विद्यार्थी वंदनीय आनंदराव पाटील सर, चिकोत्रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील सर ,या संस्थेचे सचिव , मुख्याध्यापक संघाचे सचिव, आदर्श प्रशाला कोल्हापूर या शाळेचे मुख्याध्यापक मा.आर. वाय. पाटील सर, श्री.आनंदराव पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक मा. आर. के.पाटील सर , स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ .अमृत पाटील,ज्यांची  वाणी,लेखणी,कथनी व करणी ही प्रशंसनीय व आदर्शवत आहे ते *गुलमोहर* या  काव्यसंग्रहाचे कवी,माजी केंद्रप्रमुख सन्माननीय कुशापराव पाटील (काका),खूप प्रेमळ, प्रसन्न असणाऱ्या विवेक मेडिकलच्या उज्वला गुंजकर, डोंबिवली येथे शिक्षणक्षेत्रात योगदान देणाऱ्या संगीताताई तसेच या परिवारातील आधारस्तंभ असणाऱ्या आमच्या मावशी सौ. गीतांजली पाटील,सौ.सुलभा मावशी व सर्व बालचमूंना जातेय." तेव्हा पाटील सर   म्हणाले, **आमच्या गावची डॉ.धनु /शिल्पा पाटील हीस त्याच गावात दिले आहे.तिचे वडील डॉ.बी एच. पाटील हे गेले  45 वर्ष आमच्या गावात निस्वार्थीपणे आरोग्यसेवा देणारे आरोग्यदूतच आहेत. स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेब यांचे ते family doctor  आहेत.**" ते ऐकून आनंदाने सन्मानाने माझे मन भरून आले .कारण त्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये  आदरणीय डॉ.बी.एच.पाटील ,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पाटील वहिनी ,चिरंजीव महालक्ष्मी क्लिनिक चे बालरोगतज्ञ डॉ.अभिषेक पाटील, स्नुषा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.वरदा पाटील व नातवंडात  असलेली विनयशीलता,नम्रता, संस्कार, प्रामाणिक वृत्ती मला भावली.खरंच शिक्षकांच्याकडे काही आचारसंहिता, जीवनमूल्ये, नैतिक मूल्ये, त्यांनी कसं वागावं?, कसं बोलावं? हे ठरलेलं असताना आमच्या पेशापेक्षा सात पावलं पुढे असणारा वैद्यकीय परिवार माझ्या हृदयाच्या खोल कप्प्यात  त्यांच्या चांगुलपणामुळे विराजमान आहे. लोकाभिमुख कार्य,सकारात्मक व प्रेरणा देणारी भूमिका असणारा हा परिवार आदर्शवादी आहे.

  *घर असावे घरासारखे, नकोत  नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती*

    सध्याच्या परिस्थितीत लेखकांची संख्या तुफान आहे,पण वाचणारे नगण्य.अशा परिस्थितीत पुस्तक काढणे जिकिरीचे काम आहे, हे शिव धनुष्य डॉ. शिल्पा व तिच्यासोबत सर्व मंडळींनी पेलले हे कौतुकास्पद आहे. कारण आज प्रकाशक, डी.टी.पी ,मुखपृष्ठ, मलपृष्ठ तयार करणारे, प्रेसवाले यांची वागणूक व त्यांच्या टोळ्यांची वागणूक बघून आमच्यासारख्यांचा टिकाव लागणे मुश्कील आहे. अशा परिस्थितीमध्ये हे पुस्तक प्रकाशित करताना झालेली तारेवरची कसरत मी समजू शकते. पुस्तक का लिहायचे? तर आपल्या निधनानंतर आपला सातबारा आपल्या वारसाकडे सुपूर्द होतो; पण लिखित ठेवा असणारे आपले पुस्तक मात्र आपल्या नावानिशी अजरामर राहून ते चिरंतन राहते. स्वतः लेखक किंवा कवीला आपली पुस्तके ही अपत्या प्रमाणे असतात. त्याच्या वेदना बाईच्या बाळंतकळा सारख्या असतात.

  खूप आनंद वाटला की, काकांचे पुस्तक प्रकाशित होते. कवीचा आनंद मला त्यादिवशी 77 वयाच्या व्यक्तीऐवजी  17व्या वयातील तरूणासारखा भासत होता.अनेक उन्हाळे, पावसाळे झेलताना आपला कवीपणा ,आपली सृजनशक्ती यास तिलांजली न देता शेवटपर्यंत त्यांच्याशी नाळ जपली.स्वांन्त सुखासाठी असलेल्या कविता लिखित स्वरूपात पाहताना आणि सभामंडपातील काकांच्यावर  प्रेम करणारे रसिक मंडळी पाहताना वाटले की ,काका मावशीनी जिवंतपणीच स्वर्ग पाहिला.  कदाचित त्यांना वाटलं असेल **झाले जन्माचे सार्थक**


     सन  2002 ला माझे लग्न झाले.केवळ  6/7 महिन्यात आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर वाटणीच्या वेळी गीता मावशीनी माझ्या सासूबाईंच्या हातात ठेवलेली नोटांची रक्कम आमच्या कुटुंबाच्या आधारासाठी सुरक्षा कवच वाटले. चटणी, मीठ, तेल ,पीठ देण्यापासून ते आजतागायत पर्यंत जी ऊर्जा, भावनिक, मानसिक क्षमता, निर्माण केली याच्यामध्ये काका मावशींचा मोलाचा वाटा आहे.



    कवी दत्ता हलसगीकर, **ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत,ज्याचे सूर जुळून आलेत ,त्यांनी दोन गाणी गावीत,ज्यांचे पाय मातीत मळले,त्यांना उचलून वरती घ्यावे**

आमचे आदरणीय आर .के. दादा सर्वांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध जपणारे,प्रेरणा देणारे आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून मला त्यांचा आदर आहे. कुणाविषयी असूया, तिरस्कार, आपली चिंता, काळजी व्यक्त करणे या गोष्टींना फाटा देत अगदी देवगडच्या हापूस आंब्याप्रमाणे गोड ,मधाळ वृत्ती ठेवणारे एक विलोभनीय, स्वच्छंदी व्यक्तिमत्व आहे. आर.के.दादांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम   आपल्या कुशल  नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन करून कार्यक्रम अतिशय दर्जेदाररित्या, प्रभावीपणे पार पाडला.

                   

सन 2021/22या शैक्षणिक वर्षात माझी अन्यायकारक बदली झाल्याने मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या दरम्यान कोरोना कालावधी, गडहिंग्लज कोल्हापूर प्रवास,माझा सर्व परिवार कोल्हापूरात,मोठी मुलगी 10वी त,घराचे नुकतेच बांधकाम काढले होते, सासूबाईंचे निधन यामुळे माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाची वाताहत होत होती.अशा परिस्थितीत कुशापराव काका म्हणाले, "आपणास कोर्ट ,कचेरी काही नको.आपण सामान्य माणसं आहोत.राबून काबाडकष्ट करून पोट भरणारे असून कुठं राजकीय लोकांच्या, प्रशासनाच्या नादाला लागायला नको."

काकाच काय तर माझे जन्मदाते वडील, कॅबिनेट मंत्री नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब, शिक्षक आमदार मा.जयंत आसगावकर साहेब म्हणाले, आपल्यात कोणी कोर्ट ,कचेरी करत नाहीत;कारण विलंबनात्मक ही सर्व प्रक्रिया, वेळ, पैसा,श्रम यांचा होणारा अपव्यय,आपण कुटुंब प्रमुख असल्याने ताणतणावात जाण्याची शक्यता असते, त्यामुळे माघार घेतलेली बरी.." 

हे ते फक्त माझ्या 

काळजीपोटी बोलत होते.

 पण का कोण जाणे,ज्या काका मावशी च्या छायेखाली वाढलेले,केवळ १०वी शिक्षण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेतलेलं , प्रचंड व्यावहारिक ज्ञान,कमालीचा संयम, सहनशीलता, देव्हाऱ्यातील नंदादीपाप्रमाणे सात्विकतेच्या मार्गावर तेवणारे, सर्वात माझी असणारी अनमोल देणगी म्हणजे माझे पती व माझे मन म्हणत होते की,आपली लढाई किंवा तक्रार ही व्यक्तिशः नसून व्यवस्थेविरुद्ध आहे.आणि जर आपण अन्याय सहन करत असू तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग... ?दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून म्हटले,**जिंकलो तर इतिहास नाहीतर इतरांसाठी अनुभव** असं ठरवून मेथीची पेंडी जरी आणायची असेल तर पतीला सोबत नेणारी मी,मात्र आपल्या हक्क, अधिकारासाठी मुंबई हाय कोर्ट ला चार वेळा एकटी गेले.

  आनंदाची गोष्ट म्हणजे ८एप्रिल २०२२च्या ४थ्या तारखेला हाय कोर्ट चा निकाल माझ्या बाजूने लागला आणि सर्व राज्यभर वर्तमानपत्रात या निकालाच्या बातम्या झळकू लागल्या.यातील मला काहीच माहिती नाही आणि पहिला फोन मला सन्माननीय रावसाहेब पाटील सरांचा आला.

 **सुषमा अभिनंदन!खरच तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.ग्रामविकास विभागा,शासनाविरूद्ध तू लढून जिंकलीस, खुप तुझा अभिमान वाटतो**

  ही प्रेरणादायी, प्रशंसनीय वाक्ये माझ्यासाठी लाखमोलाची आहेत.कारण याच काकांनी मला २००१ते २०१२या कालावधीत कॅसल व्ह्यू अकॅडमी गारगोटी या शाळेच्या माध्यमातून उभारणीचे, खंबीर होण्याचे बाळकडू दिले होते.मी कॅसल व्ह्यू त होते; तेव्हा फक्त एक टिंब होते पण आज त्या टिंबाचे व्यापक विशाल यशाचे वर्तुळ झाले. हे श्रेय आर.बी.काका,आर.वाय.पाटील सर व संस्थेच्या सर्व संचालक मंडळींना देते.त्यांनतर अनेक मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी, नागरिक,नातेवाईक यांचे फोन कौतुकासाठी आले.एक काळ असा होता की, माझ्यावर अन्याय झाला , त्यावेळी मी एक आई म्हणून अनेकांचे मी दरवाजे एकटीने ठोठावले पण मला कुणीच ऐकून घेतले नाही.पण मला आर. बी .काकांचे वाक्य आठवले,आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत जाणे आणि त्या कामाचा साक्षीदार केवळ अन् केवळ भगवंतच असेल.

 म्हणून अब्दुल कलाम साहेब म्हणायचे, **तुमचं तुमच्या कामावर प्रेम पाहिजे.कारण कंपनी तुम्हाला कधी काढून टाकेल समजणार नाही** 

 सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  माझ्या बाजूने लागला .**सत्यमेव जयते**हे ब्रीदवाक्य खरे ठरले.कोणतीच पार्श्वभूमी नसताना विजय मिळाला .हे लढताना एक स्त्री म्हणून अनेक अडचणी आल्या असल्या तरी माझ्या घराण्याने,चिकोत्रा शिक्षण संस्थेने दिलेले संस्कार, कुठं पळायचं आणि कुठे थांबायचे हे शिकवून गेले.एक रूपया ही कुणाला न देता उलट आमच्या सात्विक सोज्वळ वागणूकीबद्दल मला सर्व प्रशासकीय कार्यालयात नैतिक सुरक्षाकवच मिळाले. प्रशासकीय किंवा न्यायालयीन लढ्यातील सर्व भूमिका पार पाडताना बेले वाडीच्या घराण्यातील शिदोरी मला उपयोगी ठरली आणि  माझा *चांगुलपणावर* विश्वास बसला.जग खरंच खुप चांगले आहे.



   एक कवी म्हणतो,

 **जखमा अशा सुगंधी,झाल्यात काळजाला,केलेत वार ज्यांनी, तो बेलेवाडीच्या पाटलांचा गुलमोहरच असावा**

  ३जानेवारी २०२४रोजी माझ्या शासकीय सेवेच्या १२वर्षानंतर कॅसल व्ह्यू अकॅडमी गारगोटी या शाळेच्या पाणीपुजन व माता पालक मेळाव्यांसाठी वाजत गाजत, लेझीम पथक,ढोल ताशांच्या गजरात माझे स्वागत सभामंडपापर्यत केले.खरंतर सार्वत्रिक परिस्थिती अशी आहे की, लोकांनी शाळा सोडली पुन्हा त्यांच्याशी संपर्क ठेवत नाहीत असं असताना मला दिलेला मान, सन्मान हा आपल्या आपुलकी,स्नेहाचा धागा आहे हे जाणवले.

  **जो बुद्धी कमवितो तो बुद्धीमान,जो धन प्राप्त करतो तो धनवान,जो गुणांची जोपासना करतो तो गुणवान,जो कर्तव्याशी बांधील राहतो तो कर्तव्यवान पण जो नाती जपतो तो माझ्या मते *मौल्यवानच* आहे.

  

   **दवबिंदूची चमक ही गवताच्या हिरव्या पात्यावर दिसून येत असते, वाळलेल्या गवतावर नाही .तसेच माणुसकीची चमक सुद्धा हळवं काळीज असलेल्या माणसात दिसून येते, दगडाचं काळीज असलेल्या माणसात नाही.**

ही माणुसकी ,हा ओलावा, ही संवेदनशीलता, ही भावनिकता मला माझ्या बेलेवाडीच्या पाटील परिवाराकडून संक्रमित झालेली आहे. पुस्तक प्रकाशन प्रसंगी घरातील सर्व मंडळींचे नियोजन, अगदी योग्य, सूक्ष्म असे होते. या कुटुंबातील पडद्यामागील सूत्रधार असणाऱ्या उच्चशिक्षित मीनाताई, दंतरोग तज्ञ गौरी, गौरव, लोला, शुभम, अर्जुन,अनुराग, विवेक, शंतनू, डॉ. वरदा ताई यांची मुलेही कार्यक्रम दर्जेदार , परिणामकारक होण्यासाठी प्रत्येक जबाबदारी हिरीरीने पार पाडताना दिसून आले .शेवटी काय **खाण तशी मातीच** म्हणावी लागेल.

   इतरांच्या विषयी असणारा चांगुलपणा, भाबडेपणा, सहकार्यवृत्ती, दानधर्म या कुटुंबातील हे गुण मला फार भावले. म्हणून म्हणतात ना,

 जो स्वतःसाठी जगतो तो *रोगी* ,

 जो इतरांसाठी जगतो तो *योगी* , आणि जो आपल्या क्रिया कौशल्याने इतरांना आनंदित करतो तो *स्वानंदीयोगी* येते. 

    अशा या स्वानंदी,अनेकांची कुटुंब उभारण्यात, अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा पाटील परिवार आहे..या परिवाराच्या उपकारात मी सदैव आहे,मला सर्वानी केलेल्या मदतीची जाणीव नेहमी माझ्या अंतःकरणात असेल.

   *गुलमोहर* या काव्यसंग्रहानिमित्ताने कुटुंबवत्सल, प्रेम वत्सल कविवर्य आदरणीय कुशापराव पाटील काका, तसेच या कार्यक्रमांसाठी राबणाऱ्या सर्व हातांचे  मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

No comments