कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे यांनी पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन सादर केले प्रतिनिधी: सुभाष भोसले मुंबई: महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय...
कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे यांनी पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन सादर केले
प्रतिनिधी: सुभाष भोसले
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय) आठवले श्रमिक ब्रिगेडचे सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी निवेदन सादर केले.
कोयना धरण बांधण्याच्या प्रक्रियेत कोयना परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र शासनाने जागा हस्तांतरित करून धरणाचे काम पूर्ण केले. मात्र, त्यावेळी प्रभावित शेतकरी आणि नागरिकांना शासकीय नियमांनुसार पर्यायी जागा, आर्थिक मदत, तसेच शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या मागण्या अद्याप पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पिडीत शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तुषार कांबळे यांनी या संदर्भात मंत्री मकरंद पाटील यांना सविस्तर माहिती दिली आणि प्रकल्पग्रस्तांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी असे नमूद केले की, मागील अनेक वर्षांपासून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात दिलासा मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाला आहे.
या प्रसंगी शेखर गोयल, अपर्णा म्हेत्रे, सागर जगताप आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री महोदयांनी निवेदनाचा गांभीर्याने विचार करून लवकरच योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आशा निर्माण झाली असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन किती जलद पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments