आडी( ता.निपाणी) येथील संजीवनगिरीवरील सुक्षेत्र श्रीदत्तदेवस्थान मठ येथे श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दि.६ डिसेंबर पासून शनिवार दि.१...
आडी( ता.निपाणी) येथील संजीवनगिरीवरील सुक्षेत्र श्रीदत्तदेवस्थान मठ येथे श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दि.६ डिसेंबर पासून शनिवार दि.१४ डिसेंबर पर्यन्त परमाब्धिविचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परमाब्धिविचार महोत्सवात आठ दिवस दररोज रात्री साडेसात वाजता आणि श्रीदत्त जयंतीच्या दिवशी सांयकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दत्तजन्मोत्सव झाल्यानंतर परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. परमाब्धिग्रंथातील विचार हे सर्व जातिधर्मपंथांमधील लोकांसाठी सदाचाराचे महत्त्व प्रतिपादणारे विचार आहेत. परमाब्धिविचार हे धर्मादि क्षेत्रांमध्ये कालौघात उद्भवलेल्या विविध समस्यांवर उचित उपचार करणारे विचार आहेत. परमाब्धिविचार हे भाविकांच्या अन्तःकरणामध्ये ऐक्यभावनेचा संचार घडविणारे विचार आहेत. परमाब्धिविचार हे परस्पर सौहार्द प्रचाराची आवश्यकता प्रतिपादणारे विचार आहेत. अशा सर्व मंगलमय सद्विचारांनी ओतप्रोत परमाब्धि ग्रंथप्रसाराच्या उद्देशाने परमाब्धिविचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.६ रोजी सकाळी सव्वा सात वाजता कलशवीणापूजनादी होऊन महोत्सवाचा शुभारंभ होईल. या महोत्सवकाळात शुक्रवार पासून पहिले तीन दिवस म्हणजेच रविवार दि.८ पर्यन्त परमाब्धिपारायण होईल. सोमवार दि.९ पासून शुक्रवार दि.१३ पर्यन्त म्हणजेच एकूण पाच दिवस श्रीगुरुचरित्र पारायण होईल. शुक्रवार दि.१३ रोजी दुपारी आम्बील घागरींचे मिरवणुकीने आगमन होईल. श्रीदत्तजयंती शनिवार दि. १४ रोजी गुरुचरित्रान्तर्गत श्रीदत्तजन्माध्याय, देवर्षी नारदकृत दत्तात्रेयस्त्रोत्र, श्रीदत्तात्रेयवज्रकवच इत्यादीचे पठण होईल. दुपारी तीन वाजता ह.भ.प. श्री. धोंडीराम मगदूम महाराज दऱ्याचे वडगांव यांचे श्री दतजन्माख्यानावर कीर्तन होईल. श्रीदत्तजन्म सोहळा सांयकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी होणार आहे. त्यानंतर सत्कार समारोह व महाप्रसाद वितरण कार्यक्रम होईल. दैनंदिन कार्यक्रम - सकाळी ६ वाजता सुप्रभातगीतगायन, नित्यारती व दैनंदिन जप. सकाळी ७-३० ते दु. १२ पर्यंत परमाब्धि / गुरुचरित्र पारायण, दुपारी १२ ते १-३० नित्यारती व महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत 'भजनविभा' कार्यक्रम डोंगरावर दत्तमंदिर स्थानी होईल. सायंकाळी ५ ते ७-३० ' भजनसंध्या ' कार्यक्रम, रात्री ७-३० पासून नामजप, प्रवचन, सत्कार व महाप्रसाद आदी कार्यक्रम डोंगर पायथ्याशी असलेल्या सर्वेज्य सांस्कृतिक भवनात होणार आहेत. भजनविभा आणि भजनसंध्या कार्यक्रमात आडी, बेनाडी, कोगनोळी, दत्तवाडी, हणबरवाडी, सौंदलगा, कुन्नूर, हंचिनाळ, मांगूर, सुळकूड, कागल, म्हाकवे, आणूर, निपाणी, कोल्हापूर परिसरातील तसेच कर्नाटक, महाराष्ट्रातील असंख्य गांवच्या भजनी मंडळांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव काळातील पारायण, भजन, प्रवचन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments