नेर्ले गावच्या सौ .सोनाली किरण पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडॉल शिक्षक पुरस्कार' जाहीर नेर्ले गावाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार सन्...
नेर्ले गावच्या सौ .सोनाली किरण पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडॉल शिक्षक पुरस्कार' जाहीर
नेर्ले गावाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार सन्मान -
अवघ्या अडीच वर्षांच्या सेवेत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व नावीन्यपूर्ण उपक्रमांतून उमटविला वेगळा ठसा
कोल्हापूर वार्ताहर: नारायण लोहार
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय 'आयडॉल शिक्षक पुरस्कार' जि. प. केंद्रशाळा पोंभुर्ले नं. १ च्या केंद्रमुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षिका श्रीमती सोनाली किरण पाटील यांना जाहीर झाला आहे. त्यांचे मूळ गाव नेर्ले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील आहेत.त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नावीन्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने देवगड व शाहुवाडी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रीमती पाटील यांनी २४ मे २०२४ रोजी शिक्षणसेवेत पदार्पण केले. एम.ए. (मराठी), एम.ए. (भूगोल), बी.एड. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या पाटील यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत केंद्रमुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली. अध्यापनासोबत प्रशासकीय जबाबदारीही समर्थपणे सांभाळत त्यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि विकासासाठी विविध उपक्रम राबविले.
त्यांच्या कार्यातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे जि. प. केंद्रशाळा पोंभुर्ले नं. १ येथे इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच पुढील शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले. केंद्रप्रमुख साजिस्कर मॅडम, पं.स. सदस्य श्री.सादिक डोंगरकर, गावच्या सरपंच श्रीम. धावडे मॅडम,पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. देवगड तालुक्यात इयत्ता आठवीचा वर्ग सुरू असलेल्या मोजक्या शाळांपैकी पोंभुर्ले केंद्रशाळा ही एक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविण्यासाठी त्यांनी 'एक राखी देश के नाम' हा उपक्रम सुरू केला. गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील विद्यार्थिनी स्वतःच्या हातांनी राख्या तयार करून जम्मू-काश्मीर, गुजरात, केरळ आदी ठिकाणी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना पाठवतात. जवानांकडूनही या राख्यांना प्रेमळ प्रतिसाद मिळतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना रुजविण्याचे कार्य होत आहे.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील 'शिमगोत्सवात'त्यांनी 'माझे गाव, माझी शाळा' या विषयावर पटनाट्य लेखन व दिग्दर्शन करून मराठी शाळा वाचविण्याचा प्रभावी संदेश दिला. विद्यार्थ्यांनी या नाट्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपल्या नियोजनकौशल्याची छाप पाडली. गेल्या वर्षी त्यांच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन आणि व्यवस्थापन त्यांनी उत्कृष्टपणे केले. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना दिली.
शाळेच्या विकासात लोकसहभागाचे महत्त्व ओळखून त्यांनी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि महिला बचतगट यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले. पर्यावरण संवर्धन, शाळा परिसर स्वच्छता, जलसंवर्धन आणि श्रमदान यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
आद्य मराठी पत्रकारितेचे जनक आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक, कवी विंदा करंदीकर यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्ले या ऐतिहासिक आणि साहित्यिक वारसा लाभलेल्या भूमीत शिक्षणसेवेचे कार्य करण्याची संधी त्यांना लाभली आहे. या समृद्ध वारशाचा अभिमान जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक प्रवासात केंद्रप्रमुख समजिस्कर मॅडम, विस्तार अधिकारी श्रीरंग काळे सर, लहू दहिफळे सर, गटशिक्षण अधिकारी शिनगारे साहेब तसेच सहकारी शिक्षक, पालक, आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अवघ्या अडीच वर्षांच्या अल्प सेवाकाळात आपल्या कल्पकतेने, जिद्दीने आणि सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौ.सोनाली किरण पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडॉल शिक्षक पुरस्कार' जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.तसेच सौ.सोनाली पाटील यांना नेर्ले व शाहुवाडी तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments