तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा तेलंगणामधील शेतकऱ्य...
तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा
तेलंगणामधील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे गणपतराव पाटील यांचे आश्वासन
शिरोळ/प्रतिनिधी:
तेलंगणा राज्या मधील साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासत आहे. याकरिता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे वळविण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने विशेष उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे साखर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, उद्योग आणि वाणिज्य आणि विधिमंडळ कामकाज मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि 45 शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त कारखाना आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता.
ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना कारखान्याच्या अभ्यासू अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. यानंतर गणपतराव पाटील यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्यासोबत बोधनचे आमदार पी. सुदर्शन रेड्डी, माजी आमदार रवींदर रेड्डी, तेलंगणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, उद्योग आणि वाणिज्य विभागांचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन, निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू, साखर उपायुक्त छ. नरसिरेड्डी, उद्योग संचालक, साखर आयुक्त तेलंगणाचे संचालक डॉ. जी. मालसूर, साखर उपायुक्त छ. नरसिरेड्डी, हैदराबादचे सहाय्यक साखर आयुक्त सोमागणी श्रीनिवास, बोधनचे सहाय्यक साखर आयुक्त छ. व्यंकट रवी यांच्यासह शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
तेलंगणा राज्यातील उसाचे सरासरी एकरी उत्पादन 30 टना पर्यंत आहे. तेथे प्रामुख्याने भात व तंबाखू पीक घेतले जाते. त्यामुळे तेथे असलेल्या सात साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासत असल्याने सरासरी एकरी 80 टना पेक्षा जास्त उत्पादन उसाचे यावे, यासाठीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी हा अभ्यास द्वारा होता. प्रारंभी शेडशाळ येथील चेतन साजणे, शिरटी येथील अशोक चौगुले या एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्यात आली. तसेच शिरोळ, घालवाड व कवठेगुलंद येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देण्यात आली. कारखान्याच्या इंजिनिअरिंग, को जनरेशन, इथेनॉल, ईटीपी, कंपोस्ट खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेऊन सर्व उपक्रमांचे विशेष कौतुक केले. माती परीक्षण प्रयोग शाळेमध्ये जाऊन माती, पाणी आणि पाने परीक्षण तसेच अमेरिकन बनावटीचे क्लोरोफिल मीटरने अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासून जमिनीसाठी व पानावर फवारणीसाठी कोणते अन्नद्रव्य वापरावे याबाबत सखोल माहिती घेतली. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी राबविलेल्या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाद्वारे कमी पैशात उसाचे रोप कसे तयार करायचे याचेही तंत्रज्ञान आत्मसात केले.
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रोजेक्टर द्वारे सर्वांना क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प व सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर मंत्र्यांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकरी ऊस उत्पादन वाढीचा श्री दत्त पॅटर्न आणि कारखाना परिसरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन केले. गणपतराव पाटील यांनीही तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आणि संवाद ठेवून आगामी काळात काम करण्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मृदा शास्त्रज्ञ टी अंजाहा, ऊस पैदास कार राकेश, कृषी अधिकारी व माती परीक्षक पी. लक्ष्मीकांत रेड्डी, जिल्हा उद्यमविद्या अधिकारी भंडारी श्रीनिवास, दत्त चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, अमर चौगुले, दीपा भंडारे, सुनील पाटील, संजय यादव, विजयकुमार इंगळे, संतोष दुधाळे, दीपक कळेकर, चिफ इंजिनिअर मुल्लाणी, कीर्तीवर्धन मरजे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments