* *शैक्षणिक गुणवत्तेची खाण व मानबिंदू :: मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर**🏫 करवीर छत्रपतींच्या विशेषतः राजर्षी छत्र...
**शैक्षणिक गुणवत्तेची खाण व मानबिंदू :: मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर**🏫
करवीर छत्रपतींच्या विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनामुळे सुरू झालेली शैक्षणिक संस्था म्हणजे **मेन राजाराम हायस्कूल**महाराष्ट्रातील आद्य शिक्षणसंस्था पैकी ही एक विलोभनीय ऐतिहासिक वारसा असणारी १५५वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली शिक्षणसंस्था..ही संस्था केवळ कोल्हापूर चा नव्हे तर अवघ्या **महाराष्ट्राचा मानबिंदू**आहे.
व्यक्ती पेक्षा संस्था निश्चितच श्रेष्ठ! व्यक्ती प्रमाणे संस्थेच्या आयुष्यातील उन्हाळे,पावसाळे तितकेच महत्त्वाचे आहे.मेन राजाराम मधील जीवनाभूती म्हणजे सोनेरी किनार लाभलेले मुलायम वस्त्रच!नगारखान्याच्या इमारतीला लागून असलेली ही इमारत राजस्थानी पद्धतीची झाक असून मध्ययुगीन दख्खनी कलेचा किंवा मराठी रियासतीचा हा ठेवा राजवैभव म्हणून शहराच्या मध्यवर्ती दिमाखदार उभा आहे.**सत्य पथ पर चल**हे ब्रीदवाक्य सार्थ ठरविणारा या वास्तुवैभवातून अनेक महान विभूतींनी ज्ञानामृताचे धडे गिरविले आहेत.१८८०मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अख्यत्यारित सुरू झालेले काॅलेज १९१९ते १९२५पर्यत उत्तर प्रदेशातील आर्य सभा प्रतिनिधी चालवत होती.१९२७मध्ये छत्रपतींनी शेती, विज्ञान शाखा सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पारितोषिक प्रदान करण्याची मुहूर्त मेढ रोवली.मुलींना मोफत शिक्षण इथे दिले.
मेन राजाराम हायस्कूल ही एक शासकीय शिक्षणसंस्था असून या शाळेचे व्यवस्थापन १९६२पासून जिल्हा परिषद कोल्हापूरकडून केले जाते.सुरूवातीला बहुउद्देशीय म्हणजे टेक्निकल,काॅमर्स,फाईन आर्टस अकॅडेमिक असलेल्या या शाळेत राज्य शासनाचे १९७५मध्ये मंजूर केलेल्या नव्या शैक्षणिक आकृतिबंधानुसार (१०+२+३) कनिष्ठ महाविद्यालही सुरू झाले . भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, भूगोल , या विषयाच्या सुसज्ज सुव्यवस्थित भव्य प्रयोगशाळा आहेत.टेकरिंग लॅब ची ही सोय आहे.
असं म्हणतात की, शिक्षण हे खुपच उंच उंच फांद्या,फळाफुलांनी बहरलेल्या भव्य वृक्षासारखे असावे.यास शिक्षणाचा कल्पवृक्ष म्हणतात येईल.यावरील कोणत्याही फांदीवर चढल्यावर फळे मिळण्याची सोय असेल.विद्यार्थाची बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक कुवत असेल तोपर्यंत त्याने या वृक्षांवर ज्ञानरूपी फळांपर्यत चढत जावे.
**राजाराम महाराजांचे स्वप्न**
संस्थानकाळात २९वर्ष राज्य करून १८६६मध्ये तिसरे छत्रपती शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली.त्यांना पुत्ररत्न नसल्याने त्यांचे भाचे नागोजीराव पाटणकर यांना बाबासाहेब महाराजांनी दत्तक घेऊन छत्रपती राजाराम पहिले गादीवर बसले.तेव्हा ते केवळ १६वर्षाचे होते.या सातव्या छत्रपतींच्या नावानेच **राजाराम हायस्कूल सुरू झाले व पुढे१८८५मध्ये राजाराम काॅलेज स्वतंत्र झाले.
छत्रपती राजाराम महाराजांनी राजवाड्यानजीक आधुनिक राजस्थानी पद्धतीने बांधलेली इमारत तत्कालीन पाॅलिटिकल एजंट कर्नल अॅडरसन यांच्या कडे बोलून दाखवली.त्यांनीही हा विचार उचलून धरला.दि.१५फेब्रुवारी १८७०रोजी सायंकाळी ५.३०वाजता या ऐतिहासिक वास्तूचा पायाभरण समारंभ महाराजांच्या शुभहस्ते पार पडला.या इमारतीचे नकाशे आणि अंदाजपत्रक त्यावेळचा मुंबई चा इंग्रज इंजिनिअर मॅल्ट याने तयार केला होता.
या ऐटबाज दिमाखदार इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी राजाराम महाराज आणि अॅडरसन यांनी त्यावेळच्या शैक्षणिक परिस्थितीला अनुसरून भाषणे केली.अॅडरसन यांनी इंग्रज सरकारने १८४४पासून कोल्हापूरात केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेत शिक्षण प्रसारासाठी प्रयत्नांचा परामर्श घेतला.
यावेळी महाराज म्हणाले होते की, राजस्थानी पद्धतीने बांधलेली ही वास्तू **कोल्हापूर शहराचे कायमचे भूषण**ठरेल.विद्याप्रसारासाठी व प्रजेच्या हितासाठी हा माझा प्रयत्न असल्याचे समजतो.दुर्दैवाने महाराजांचा मृत्यू ३०नोव्हेंबर १८७०रोजी इटलीत झाल्याने त्यांना ह्या वास्तूचे पूर्ण रूप पाहता आले नाही.
पाच लाख रूपये खर्च करून काळ्या दगडात बांधलेल्या दुमजली असलेल्या या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार पोर्च सारख्या कमानीतून येत आहे.तेथील दरवाजा थेट सभागृहात उघडतो.दोन्ही बाजूच्या बहुकोनी टाॅवरसारख्या रचनेतील गोल जिन्याने वरच्या मजल्यावर जाता येते.तळमजल्यावर सभागृहाच्या दोन्ही बाजूला वर्ग खोल्या असून त्यापुढे प्रशस्त व्हरांडा सुंदर नक्षीदार खांब आणि त्यावर आधारलेल्या कमानीच्या सौंदर्यात शोभणारा आहे.दुसर्या मजल्यांची उंची मध्यवर्ती सभागृहाला आहे. तिसऱ्या मजल्यावर एक हाॅल असून सध्या तिथे दोन वर्गात विभागणी असून उर्वरित रिकाम्या गच्चीला प्रत्येक कोपर्यावर घडीव दगडाच्या खांबाच्या चौकोनावर घुमटाकार छत्री आहे.मुख्य इमारतीसमोर करवीर नगर वाचनालय असून तिथे घडीव खांबांच्या गेटमधून आत आल्यावर कारंज्याचा हौद आहे.
मागील बाजूस दुमजली इमारत पागा बिल्डिंगच्या भिंतीला लागून आहे.मुख्य इमारतीपासून या इमारती दरम्यान खुले मैदान असून तेथून जुन्या राजवाड्याच्या चौकात जाता येते.अलीकडे हा मार्ग बंदिस्त आहे.प्रत्येक खोलीतील भिंतीवर असणारे नक्षीकाम, छतावरील सजावट आणि भव्य नक्षी,दरवाजे खिडक्या, जाळ्या,पार्टीशन, खांबावरील नजाकत,आजही नजर खिळवून ठेवणारी आहे.काळ्या दगडात बांधलेली ही वास्तू हवेशीर थंड व आल्हाददायक आहे.
**१८५१::**ही शाळा स्थापन केल्याचे म्हटले जाते.
**१८७०::**शाळेची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराजांनी केली.
**१८७७::**इलेस्ट्रेटेड लंडन न्यूज मध्ये प्रकाशित झाल्याची कागदपत्रे
**१८८०::** शाळेचे काॅलेजमध्ये रूपांतर
**१९६२::**शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद कोल्हापूर कडे.
**गणेश नेर्लेकर -देसाई यांनी शोधली तारीख**---
शाळेची पायाभरणी १५फेब्रुवारी १८७०रोजी राजाराम महाराजांनी केली.याची माहिती कोल्हापूर चे इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी प्रकाशात आणली.या संदर्भातील सचित्र बातमी लंडनच्या **इलेस्ट्रेटेड लंडन न्यूज**मध्ये ८डिसेंबर १८७७च्या अंकात प्रसिद्ध झाल्याची कागदपत्रे त्यांना मिळाली.राजाराम महाराजांनी पाहिलेले शाळेचे स्वप्न दि २०आक्टोबर १८७४मध्ये पूर्ण झाले.शाळेची प्राथमिक माहिती महाराजांच्या **डायरी ऑफ राजा**मध्ये होती.ही नोंद नेर्लेकर-देसाई यांचे कडे आहे.हायस्कूलच्या मुख्य दरवाजावरील शिलालेख पाहून या तारखेची त्यांनी खात्री केली आहे.
**राजर्षी शाहू महाराजांचाही हातभार**--
ही शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी कोल्हापूर संस्थानातील अनेक जहागिरदारांनीही आर्थिक भार उचलला होता.त्यांनी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा कारभार हाती घेतल्यापासून ही मदत देणे बंद केले तरीही शाहू छत्रपतींनी राजाराम काॅलेज सुरू ठेवले.बहुजनांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणात पैसा कमी पडतो आहे हे लक्षात येताच त्यांनी १९१८च्या जूनपासून राजाराम काॅलेज बंद करण्याचा निर्णय घेतला.परतु नंतर पुनर्विचार करून राजाराम हायस्कूल व राजाराम काॅलेज आर्य प्रतिनिधी सभेकडे जून १९१९पासून सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला.
**विविध परीक्षांचे केंद्र::**
मेन राजाराम हायस्कूल म्हणजे विविध परीक्षा आणि शासकीय समन्वयाचे केंद्र च..या शाळेत एमपीएससी, महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणेचे टायपिंग,स्टेनोच्या परीक्षेचे अनेक वर्षांपासून चे हक्काचे केंद्र आहे.याशिवाय अकरावी परीक्षेसाठी मध्यवर्ती प्रवेश मिळविण्यासाठी चे मोठे केंद्र शैक्षणिक समस्येसंदर्भातील समन्वयासाठी येथेच बैठक होतात.
**दीडशे वर्षांचा इतिहास::**
या शाळेला प्रदीर्घ असा १५५ वर्षाचा इतिहास आहे . १८फेब्रुवारी २०२५रोजी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी संपन्न होत आहे.**इलेस्ट्रेटेड लंडन न्यूज, डायरी ऑफ राजा**या जून्या व दुर्मिळ कागदपत्रांसह विस्मृतीतील संस्थान कोल्हापूर, करवीर रियासत कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य गॅझेरिअममध्ये या शाळेचे संदर्भ मिळतात.सुरूवातीला येथे मुलींसाठी कोल्हापूर हायस्कूल ही शाळा सुरू झाली.काॅलेजचे बांधकाम झाले तेव्हा ही शाळा शुक्रवार पेठेत स्थलांतरित केली.सध्या तिथे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे.काॅलेजच्या वास्तूचे काम पुर्ततेनंतर पुन्हा या ठिकाणी शाळा सुरू होऊन राजाराम काॅलेज शिवाजी विद्यापीठ परिसरात स्थलांतरित झाले.मूळ मुख्य वास्तू म्हणून या शाळेला **मेन राजाराम**असे म्हटले जाते.
**मला खात्री आहे की, शिक्षण प्रसाराच्या कार्याला अलिकडे जे प्रोत्साहन देण्यात येत आहे ते अल्पकालीन ठरणार नाही.लोकांच्या जुन्या समजूती नाहिशा होतील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल... छत्रपती राजाराम महाराज (१६फेब्रुवारी१८७०)**
**खालील सुपुत्रांना या ज्ञानमंदिराने घडविले**---
न्या.महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले,सर एस व्ही सबनीस दिवाण, कोल्हापूर संस्थानाचे दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे, प्राचार्य व्ही एस आपटे, बॅरिस्टर एस के केळवकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, डॉ बी सी पाटील-थोरात, न्यायमुर्ती व्ही जी चव्हाण,विजय हजारे,कृषी तज्ज्ञ रावबहादूर डॉ बी.सी.पाटील , डॉ आप्पासाहेब पवार,रॅग्लर व्ही सी नारळीकर, मंत्री बाळासाहेब देसाई,नॅट विमानाचे डिझायनर घाटगे, क्रीडा संघटक पी एस उपळेकर, डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार,रॅग्लर जयंत नारळीकर, पनवेल चे आयुक्त गणेश देशमुख,पै.खाशाबा जाधव,जे पी नाईक,गोपाळ टेंबे,व्ही टी पाटील ....तसेच शिक्षण सहसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर चे सुभाष चौगुले, साहित्यिक ना सी फडके, शिवाजी सावंत हे येथील शिक्षक..या शाळेतील शताब्दी महोत्सवासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती.त्यावेळी शताब्दी विशेषांक काढला होता.
सद्यपरिस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाकडे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेकडे विद्यार्थी पंचक्रोशीतून शिकण्यासाठी येत आहेत.शहरात गुणवत्तापुर्ण असणारे हे ज्ञान मंदिर दोन क्रमांकावर विराजमान आहे.सध्याचे जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा संजय सिंह चव्हाण व प्राथमिक शिक्षणाधिकारी मा आशा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू होऊन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली ई लर्निग क्लासरूम, विद्यार्थाना मोफत प्रवासाची सोय,शालोपयोगी साहित्य,वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत .या प्रशालेची धुरा प्राचार्य मा डॉ गजानन खाडे सर सांभाळत आहेत.डोळ्याचे पारणे फिटणारे अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी ने नटलेल्या काॅलेजमध्ये मला शिक्षक म्हणून सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.त्याबद्दल मी प्रशासनाची आभारी आहे... दिवसेंदिवस प्रशालेचा प्रपंच वाढत जाऊन या परिस स्पर्शाने परिसराचे, कर्मचारी, विद्यार्थी रूपी जीवनाचे बावनकशी सोने होऊ लागले आहे . माणसातील कलागुणांचा विकास, संस्कारांची शिकवण,मानवी मूल्यांचे संक्रमण, स्वावलंबन,उद्योगप्रियता , श्रमप्रतिष्ठा, चारित्र्य, ज्ञानलालसा,सेवेप्रती श्रद्धा व निष्ठा, राष्ट्रीय भावना, देशाभिमान,शिस्त या सद्गुणांची जोपासना होऊन संस्कार शील, कर्तव्यनिष्ठ पिढी तयार करण्याची जबाबदारी आम्हा गुरूमाऊली वर आहे याची जाणीव ठेवून जेव्हा आम्ही केवळ विद्यार्थी हित समजून काम करू तेव्हाच छत्रपती शाहू महाराज यांच्या या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना अर्पण केलेली आदरांजली सार्थ ठरेल!!!
शाळेचे वास्तू वैभव,ज्ञान वैभव जतन, संवर्धन करण्याची शक्ती आई जिजाऊ आम्हास देवो हीच प्रार्थना🙏🙏 म्हणून च म्हणावेसे वाटते की,
ही आवडते मज मनापासुनी शाळा,
लाविते लळा जसा माऊली बाळा🙏
उपरोक्त काही संदर्भ पर्यावरण तज्ज्ञ उद्य गायकवाड, पत्रकार समीर देशपांडे यांच्या लिखित बातमीपत्रातून घेतली आहे.🙏🙏
दिव्यत्वाची जेथे प्रचितीl तिथे कर माझे जुळती👏🏻
शब्दांकन:::
**प्रा सुषमा अरूण पाटील** जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, *मेन राजाराम काॅलेज कोल्हापूर** फोन नंबर .9689166864 |
No comments