सोशल मीडिया माध्यम याचा प्रभावी वापर हे राजकीय पक्षांसाठी काळाची गरज आहे.....!!! भारतात सोशल मीडियावर काम करून या नेटवर्कद्वारे लोकांच्या मन...
सोशल मीडिया माध्यम याचा प्रभावी वापर हे राजकीय पक्षांसाठी काळाची गरज आहे.....!!!
भारतात सोशल मीडियावर काम करून या नेटवर्कद्वारे लोकांच्या मनावर राजकीय प्रतिमा तयार करण्याचे काम सर्वप्रथम भाजप पक्षाने सुरू केले आणि त्यामुळेच त्यांना नरेंद्र मोदी हा चेहरा पंतप्रधान म्हणून देशापुढे आणला. यात त्यांना यश सुद्धा आले आणि म्हणूनच भाजपची सोशल मीडिया टीम हे जाणून असल्याने आजपर्यंत त्यांनी या माध्यमातूनच लोकांना अधिक प्रभावित करीत लोकसभा, राज्यसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकत आल्या आहेत.
मागच्या अडीच वर्षात युती सरकारने महाराष्ट्रात तसे पाहायला गेले तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच चांगली कामे सरकारने केली पण त्यांचे ब्रॅण्डिंग व प्रसिध्दी सोशल मीडियाच्या माध्यमातून करून एकप्रकारे आपल्या चांगल्या कामामुळेच जनतेने पुन्हा आम्हाला निवडून दिले ,हे धारिष्ट्य करण्याची हिंमत भाजप मध्ये आली. वास्तविक पाहता यात EVM चा घोटाळा आहे की नाही ,हा संशोधनाचा भाग असला तरी आजच्या घडीला भाजप हे मान्य करायला तयार नाही. असो, या विषयावरती सातत्याने चर्चा आणि आंदोलने झाली असली तरी यातून निष्पन्न काही झालेले नाही. पण त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा कसा आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हे नक्कीच भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून शिकण्यासारखे आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम भाजपने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला आणि त्यांना एक हाती सत्ता मिळवण्यात यशसुद्धा आले, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यानंतर त्यांनी इतर पक्षातील राजकीय नेते यांना कसे हाताशी धरून त्यांचे पक्ष देशोधडीला लावले, हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे.
आताच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदेंचा चेहरा एक "कॉमन मॅन" असा तयार करून जनतेसमोर आणला. शिंदेंना सुद्धा यामध्ये काही गैर वाटले नसावे, म्हणूनच त्यांच्या सरकार स्थापन करण्याच्या अगोदरच्या अखेरच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा त्यांनी "चीफ मिनिस्टर(CM)" म्हणून नव्हे तर "कॉमन मॅन(CM)" म्हणून स्वतःचा उल्लेख केलेला दिसतो.
आजच्या घडीला तरुण पिढी ही सर्वात जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या जवळ असून त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधते आणि चुकीच्या पद्धतीने समोर आलेल्या गोष्टींवर सुद्धा सहज विश्वास ठेवते. आपल्यासमोर आलेली कोणतीही गोष्ट ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचलेली असल्याने त्यात कितपत तथ्य आहे, याची शहानिशा करण्याची तसदी सुद्धा आजची तरुण पिढी घेताना दिसत नाही.
आज जगामध्ये सर्वाधिक तरुण देश म्हणून आपल्या भारत देशाचा समावेश होतो व हीच तरुण पिढी आपला नेता व आपले सरकार निवडण्याची जबाबदारी खांद्यावर उचलत आहे. म्हणूनच या तरुण पिढीकडे आपण गांभीर्याने पाहणे गरजेचे असून ते ज्या प्रभावी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत तयार करत आहेत, तो सोशल मीडिया वापर आपणसुद्धा प्रभावीपणे राबविणे ही आजच्या काळाची गरज आहे.
या सोशल मीडियाने तरुण पिढीला तर प्रभावित केलेच आहे पण आत्ताचे राजकारणी यांना सोशल मीडियाचे महत्त्व आणि गांभीर्य समजल्याने अधिकाधिक प्रमाणात सोशल मीडियाचा वापर आपल्या लोककल्याणाच्या कामात करताना दिसून येत आहेत.
महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातील एका कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून पाच लाख रुपयांची मदत करण्यासाठी असलेल्या फाईलवर सर्वप्रथम स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री या नात्याने त्यांचे हे प्रथम कर्तव्यच होते, पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ज्या कुटुंबाला सरकारतर्फे मदत करण्यात आली त्यांच्याशी त्यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपची मंडळी सगळीकडे वायरल करत आहेत. एकंदरीतच काय की सोशल मीडिया हा किती प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेच्या आणि तरुण पिढीच्या मनावर आणि विचारांवर बिंबवला जाऊ शकतो, याची कल्पना असल्यानेच मुख्यमंत्री सुद्धा याचा वापर करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री नव्हे जे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहेत, या अगोदरसुद्धा वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा याच मीडियाचा प्रभावीपणे वापर केला आहे.त्यात त्यांना स्वतःची प्रतिमा जनतेत तयार करण्यात कितपत यश मिळाले , हा सुद्धा रिॲलिटी चेक आहे.
आज तसे पाहायला गेले तर अनेक तरुण-तरुणी हे सोशल मीडियाचा वापर करून आपली उपजीविका करत आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीने लोकांसमोर पक्षाची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक होतकरू व चांगली विचारधारा असलेली तरुण पिढी काम करीत आहे. या तरुण पिढीला पक्षाने सुद्धा तेवढीच मदत आणि सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा आपल्याला असेही पाहायला मिळते की, एखाद्या पक्षाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट ही पक्षाच्या दृष्टिकोनातून हिताची असलेली साधी शेअर करणे सुद्धा काही पक्षातील राजकीय नेत्यांना जमत नाही. या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया टीम तयार केली आहे, पण फक्त स्वतःच्या कामाची आणि स्वतःची प्रतिमा उजाळून निघेल, या दृष्टिकोनातूनच त्यांची टीम काम करते पण याचा पक्षाला फायदा होताना कुठेही दिसत नाही.
काही राजकीय पक्षांनी तर स्वतंत्र अशी सोशल मीडिया टीम तयार करून त्यांना मोठमोठे ऑफिस सुद्धा घेऊन दिलेले आपल्याला ऐकिवात असतील. पण या टीम मध्ये काम करणारे जे तरुण-तरुणी आहेत त्यांना राजकीय आणि सामाजिक विषयांची जाण कितपत आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे..? या सर्व बाबींचा विचार करता आपल्या हे लक्षात यायला पाहिजे, की नुसती सोशल मीडिया टीम तयार करून त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाला फायदा होणार नाही. यासोबतच पक्षात सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारे व जनसंपर्क असणारे आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय व सामाजिक विषयांची जाण असणारे तरुण-तरुणींची एक फौज सर्व राजकीय पक्षांनी आता उभी करणे ही काळाची गरज बनली आहे.तसेच सर्व राजकीय पक्षांनी अगोदर सोशल मीडियाच्या प्रभावी वापर करण्यापूर्वी पक्षातील नेतेमंडळी यांनीसुद्धा सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेत पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्याचबरोबर पक्षात असे सुद्धा कार्यकर्ते असते जे काहीही सोशल मीडिया वर पोस्ट करून पक्षाला हानी पोहचेल असे काम करत असतात. त्यांचा तसा उद्देश नसतो पण न कळतपणे त्याचा पक्षाला फटका हा बसत असतोच. अश्या लोकांना पक्षाने आवर घालणे तितकेच महत्वाचे आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यावर अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता काम घेऊन आमच्याकडे येऊ नका, ज्यांना मतदान केले आहे त्यांच्याकडे जा, आमचे घरचे दरवाजे आता बंद आहेत असे चुकीचे संदेश समाजात जाईल अश्या पोस्ट केल्या, त्यामुळे खूप वाईट पद्धतीने पक्षाचे चित्र निर्माण होते आणि सरतेशेवटी त्याचा फटका परत पक्षालाच बसतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे तरुण पिढीला योग्य दिशा आणि मार्ग दाखवणे ,हे त्या पक्षातील वरिष्ठ राजकीय नेत्यांचे सुद्धा तितकेच जबाबदारीचे काम आहे. यासाठी नेत्यांनी महिन्यातून किमान चार वेळा या सोशल मीडिया टीम सोबत सवांद साधून आताच्या घडीला सर्वसामान्य जनतेत काय चर्चा सुरू आहे, कोणत्या विषयावर आपल्या पक्षाने भूमिका घेतली पाहिजे, कोणते विषय टाळले पाहिजे जेणकरून पक्षाला नुकसान होईल, कोणती अशी अपेक्षा जनतेत आपल्या पक्षाकडून आहे, याचा मागोवा घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आणि आवश्यक आहे.
आज भाजप या सर्व पातळींवर सरस ठरत आहे, म्हणूनच त्यांच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम करणाऱ्या टिमधील लोकांशी संवाद साधला तर आपल्याला कळेल की ,ते कोणत्या प्रकारचे काम करत आहेत ज्यांचा आपण कधीही विचार सुद्धा केलेला नसेल. आज बूथ पातळीवर आपल्या पक्षाला किती मतदान होऊ शकते ते कोणता नेता हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकतो आणि त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यांचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे आजच्या तारखेला आहे.
आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्याला थोडासा अवधी असला तरी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सोशल मीडियाची ताकद ओळखून त्यावर नक्कीच काम करणे आवश्यक आहे. EVM घोटाळा वैगरे आदी आरोप राजकीय पक्ष तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला आपल्याकडे बूथ पातळीवर किती मतदान हे आपल्या पक्षाचे आहे,हे तुम्ही छातीठोक पणे माहिती असेल. नाहीतर हवेत गोळीबार आणि चाळीस ठार असे वागून आताच्या घडीला निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाला जिंकता येणार नाहीत.
आपला
निलेश भोसले
No comments