कोल्हापूर प्रतिनिधी: सुकुमार भोसले परमाब्धितील विचार सर्व जाती, धर्म, पंथांमधील लोकांमध्ये ऐक्य भावना वाढविणारे आहेत. धर्मादी क्षेत्रांमध...
कोल्हापूर प्रतिनिधी: सुकुमार भोसले
परमाब्धितील विचार सर्व जाती, धर्म, पंथांमधील लोकांमध्ये ऐक्य भावना वाढविणारे आहेत. धर्मादी क्षेत्रांमध्ये कालौघात उद्भवलेल्या विविध समस्यांवर उचित उपचार करणारे विचार आहेत, असे प्रतिपादन प.पू . परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी ) येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित परमाब्धिविचार महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते कलश व विणा पूजनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून भाविकांना संकल्पधागा बांधण्यात आला. विश्वधर्म ध्वजाचे आरोहण करण्यात आले. परमाब्धि ग्रंथाचे पूजन, नामजप करून परमाब्धि ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पारायणाचे नेतृत्व नामदेव महाराज, श्रीराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज यांनी केले. अमोल महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज, मारुती महाराज यांनी नित्य आरती, नामजपाचे नेतृत्व केले. पारायणामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, सध्याच्या काळात जाति, धर्म, सम्प्रदाय इत्यादींच्या आधारावर असलेल्या वैमनस्याने प्रचण्ड कहर माजवला आहे. त्यामुळे माणसांच्या मनामधील शान्ती हरवली आहे. प्रचण्ड सुडाच्या भावनेने माणसांची मने पेटून उठल्यामुळे ती मने अत्यन्त अस्वस्थ झाली आहेत, अशान्त झाली आहेत.
अशा भयावह परिस्थितीमध्ये माणसांच्या मनातील परस्पर द्वेषाच्या भीषण जाळाला शांत करून मनाला शांती प्रदान करण्यासाठी सौहार्द विचारांची सर्वांना गरज आहेच. सर्व जातिधर्मपंथांमधील लोकांसाठी सदाचाराचे महत्व प्रतिपादन करणारे विचार श्रवण करण्यासाठी सर्व भाविकांनी परमाब्धिविचार महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले.
यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळ, सौंदलगा, निपाणी, कागल, बेळगांव, कोल्हापूर, सांगली, पुणे आदी भागातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती.
No comments