२७ नोव्हेंबर ब्लॅक फ्रायडे निमित्त गिग वर्कर्स आणि फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन! विमा संरक्षण, योग्य मोबदला, रोजगाराची ...
२७ नोव्हेंबर ब्लॅक फ्रायडे निमित्त गिग वर्कर्स आणि फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन!
विमा संरक्षण, योग्य मोबदला, रोजगाराची सुरक्षितता आणि फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा मिळावी; हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीचा पुढाकार
२७ नोव्हेंबर ब्लॅक फ्रायडे निमित्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या गिग वर्कर्स तसेच छोटे व्यापारी, रस्त्यावरील फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनातून गिग वर्कर्सच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये कामगारांना विमा कवच व अपघाती विमा संरक्षण मिळावे, कामाच्या तुलनेत योग्य मोबदला देण्यात यावा, कामगारांना कायमस्वरूपी रोजगाराची सुरक्षा मिळावी, कोणतीही योग्य प्रक्रिया न करता कामगारांचे आयडी ब्लॉक करण्याची पद्धत बंद करावी तसेच दहा मिनिटांत डिलिव्हरी पोहोचविण्याचे अवास्तव वेळेचे बंधन रद्द करावे, अशा मागण्यांचा समावेश होता.
त्याचबरोबर रस्त्यावरील छोटे व्यापारी, फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांनाही न्याय मिळावा, त्यांना अधिकृत परवाने (लायसन्स) देण्यात यावेत, व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली होणारा त्रास थांबवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनासाठी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या अध्यक्षा सौ. निर्मला कुराडे यांनी पुढाकार घेतला, तर कमिटीचे सेक्रेटरी संतोष खटावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष संदीप साळुंखे यांनीही सहभाग नोंदविला.
या आंदोलनात नारायणी बचत गटाच्या सौ. सुमन शिंदे, विद्या चव्हाण, शुभांगी भेंडवडे, आशा सावंत, प्रियंका लाड, अमन सय्यद, अथर्व शिंदे, आदित्य पोवार, ऋतुराज पाटील, ऋतुराज जाधव, समर्थ लाड आणि अवधूत कुराडे यांनी सहभाग घेतला.
मोठ्या कंपन्यांच्या विकासात ज्यांच्या कष्टांचा मोठा वाटा आहे, त्या कामगारांनाच जर सुरक्षितता आणि न्याय मिळत नसेल, तर हा गंभीर प्रश्न आहे. कामगारांना सन्मानाने जगण्याचा अधिकार, योग्य मोबदला आणि सुरक्षित रोजगार मिळालाच पाहिजे. तसेच फेरीवाल्यांनाही व्यवसाय करण्यासाठी सन्मानाची आणि कायदेशीर जागा मिळाली पाहिजे.
हे आंदोलन केवळ काही मागण्यांसाठी नसून कष्टकरी कामगार, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकारासाठी उभारलेला आवाज आहे.

No comments