*पुण्यश्लोक कर्मयोगिनी: अहिल्याबाई होळकर* इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी व्यक्तिमत्वांची प्रतिक्षा असते या पानांची उपेक्षा होऊ नये ...
*पुण्यश्लोक कर्मयोगिनी: अहिल्याबाई होळकर*
इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी व्यक्तिमत्वांची प्रतिक्षा असते या पानांची उपेक्षा होऊ नये म्हणून नियती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरसारखी कर्तबगार व्यक्तिमत्व जन्माला घालत असते.
जॉन मालकम नावाचा विचारवंत म्हणतो की,भारताला अहिल्याबाई अशी एक राणी मिळाली की, जिच्या ठिकाणी गंगेचे पावित्र्य, सागराचे गांभीर्य, सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता यांचा मनोहर निलाभ झालेला होता. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे पाटील यांच्या पोटी इसवी सन 1725 मध्ये अहिल्याबाई नावाचे कन्यारत्न जन्माला आले .बालपणातच अहिल्याबाईवर सात्विकतेचे, शौर्याचे आणि वीरत्वाचे संस्कार त्यांच्या आई-वडिलांनी केले. लिहिण्या वाचण्याबरोबरच घोड्यावर स्वार होण्यात आणि तीरकामठा चालवण्यात त्या प्रवीण झाल्या होत्या.
एकदा गावात आलेल्या पाहुण्यांनी अहिल्याबाईंना झाडावरचा बुलबुल टिपण्यास सांगितले.छोटी तेजस्वी आहिल्या पटकन म्हणाली, तो बुलबुल काय माझा शत्रू आहे ..तोही आमचा पाहुणा आहे. पाहुण्याला मारण्याची आमची प्रथा नाही. निष्पाप जिवांवर, मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे.' या चुणचुणीत धाडशी मुलीने पुढे इंदूर संस्थानची सत्ता हाती असताना जनावरांसाठी राखीव कुरणे आणि पक्ष्यांसाठी अभयारण्य निर्माण केली तसेच ती जोपासली सुद्धा. पर्यावरण, परमार्थ आणि प्रशासन या तीनिक क्षेत्रात प्रभावी मुद्रा उमटवणाऱ्या अहिल्याबाई पुण्यश्लोक कर्मयोगिनी होत्या. अग्नी दिव्यातून त्या तावून सुलाखून निघाल्या होत्या. अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा खंडेराव होळकरांशी विवाह झाला. खंडेराव हे सुभेदार मल्हारराव होळकरांचे पुत्र. त्यांना पतिसुख फारसे मिळाले नाही. पुत्र मालेराव आणि कन्या मुक्ताबाई अशी दोन अपत्य प्राप्त झाली, पण 1754 च्या मध्ये एका युद्धात खंडेरावांचा अंत झाला.
प्रथेप्रमाणे अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या; पण सासरे मल्हाराव यांनी सुनेला सती जाण्यापासून परावृत्त केले . मुत्सद्दी सासऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी अहिल्याबाईंना थांबविले आणि इतिहासा लाही नवल वाटावे असे कर्तृत्व विधात्याने अहिल्याबाईंच्या हातून करून घेतले. ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या या राणीने अखिल भारतात अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. घाट बांधले. विहिरी बांधल्या. अन्नछत्रे उघडून जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे आहिल्याबाईंचे नाव आहे, पण मंदिर उघडणाऱ्या या राणीने माणसांच्या अंत:करणात देवीचे स्थान प्राप्त केले.
1766 मध्ये सासरे मल्हारवांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई उदास झाल्या; पण प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी दुःख पोटात ठेवून त्यांच्या दुःखात भर म्हणून होळकरशाहीतील दिवाण गंगाधर तात्याने राघोबा दादांशी संधान बांधले. अहिल्याबाईंना या कपट कारस्थानाचा सुगावा लागला .त्यांनी थोरल्या माधवराव पेशव्यांकडे तक्रार नोंदवली माधवरावांनी अहिल्याबाईंना कळवले," तुमच्या दौलतीविषयी कोणी पाबुद्धी धरील त्याचे पारिपत्य जाहीर करावे."
अहिल्याबाईंचे आत्मबळ वाढून त्यांनी भोसले, गायकवाड, शिंदे ,दाभाडे या मराठी सरदारांना मदतीची हाक दिली. राघोबा 50 हजार फौजेनिशी उज्जयनीजवळ अंकपात घाटावर मुक्कामी आले. लढाई अटळ असल्याची खात्री वाटू लागताच अहिल्याबाईंनी राघोबाला पत्र पाठवले,'मी बाई माणूस काय करणार म्हणून मनात आणू नये. स्त्री म्हणून कमकुवत समजू नका. खांद्यावर बासडा (भाला) टाकून उभी राहीन. स्वराज्याच्या दौलतीचे रक्षण करीन. आमच्या वाडवडिलांनी तलवार चालवून शरीर कष्ट घेऊन दौलत कमविली आहे .आपणास लक्षात असू द्यावे ,मी सुभेदारांची सून आहे. बाईचा पराभव झाला तर कोणी नावे ठेवणार नाही पण जे तेव्हा लढाई न करण्यात आपले कल्याण आहे' आणि काय आश्चर्य राघोबांनी लढाई टाळली,मान राखून घ्यावा म्हणून इंदूरला गेले. अहिल्याबाईंचा दबदबा, त्यांची लोकप्रियता आणि त्यांचे आदर्श जीवन पाहून पुरते खजील झाले. अहिल्याबाईंनी मुत्सद्दीगिरीने राघोबावर विजय मिळवला.
हिंदूच्या संस्थानच्या प्रजेच्या मनात आपल्या राणीविषयी आदरभाव वाढला.
अहिल्याबाईंनी 28 वर्ष राज्य कारभार केला. त्यांच्या कारभाराचे दोन भाग होते. एक खाजगी आणि दुसरा दौलत .
त्यांचे खाजगीचे उत्पन्न 15 लाखाचे होते, त्यावर त्यांची पूर्ण मालकी होती. पण पाऊण कोटी उत्पन्नाचा मुलुख आणि 16 लाखाची रोकड असे आरंभीच्या काळाची दौलत वाढत गेली. हे उत्पन्न एक कोटीपर्यंत गेले.
अहिल्याबाईंची वैशिष्ट्ये हे की ,त्यांनी दौलतीची म्हणजे राज्याची रक्कम कधी वैयक्तिक दानधर्मासाठी वापरली नाही तर आपल्या खाजगी उत्पन्नातून धार्मिक कार्य आणि दानधर्म केला.
अहिल्याबाई दानशूर होत्या .सात्विक प्रवृत्तीच्या कुशल प्रशासक होत्या. 'महेश्वर'हे शहर त्यांनी राजधानी म्हणून पसंत केले. त्या शहराला रूप , वैभव दिले. नर्मदा आणि महेश्वरी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे शहर आज 'महेश्वरी' साड्यांमुळे प्रसिद्ध आहे, पण त्यासाठी अहिल्याबाईंनी नियोजनपूर्वक कष्ट घेतले.
वस्त्रोद्योगास प्रोत्साहन दिल्याने बाजारपेठा, व्यापार वाढला. अहिल्याबाईंनी कलावंतांना, शाहिरांना, शिल्पकार पाथरवर कारागिरांना प्रेरणा देऊन त्यांच्या प्रतिभेला न्याय दिला. त्यामुळेच कवी मोरोपंत, शाहीर आनंद फंदी यांचे कवित्व हा माय मराठीचा अक्षरठेवा झाला आहे .
अहिल्याबाईंनी छत्रपती शिवरायांनी जोपासलेले स्वराज्याचे धोरण आपल्या संस्थानात राबवले. प्रजाहितदक्षपणा ,कर्तव्य कठोरता ,गुणग्राहकता, उत्तम प्रशासन आणि मानवता यांचे विलोभनीय दर्शन त्यांच्या जीवनचरित्रातून घडते.
दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. दीर्घ मुदतीच्या कराराने आणि जमिनी पट्ट्यांने दिल्या. सैन्याकडून पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणून जादा शेतसारा वसूल करणाऱ्या तसेच अप्रामाणिक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना प्रचंड दंड करून शिक्षा दिल्या. प्रामाणिक अधिकाऱ्यांची कदर करून विधवा स्त्रियांना दत्तक घेण्यास अनुमती दिली. पर्यावरणासाठी वृक्षारोपण , तहानलेल्या गावांसाठी बंधारे, सरोवर, तलाव निर्माण केली
मराठी संस्कृतीला अभिमान वाटावा असे तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्व 1795 मध्ये काळाच्या पडद्यात गेले. आजही मध्य प्रदेशात देवी 'अहिल्योत्सवा' च्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागवल्या जातात. कला, साहित्य , संस्कृती चा ऐतिहासिक सोहळा म्हणून संपूर्ण विश्वातले महान नेते, विचारवंत ,कलावंत तेथे येतात.
ज्योना बोला नावाच्या इंग्रजी कवयित्रीने 'अहिल्याबाई' चैतन्यस्त्रोत वाटावी अशी दीर्घ कविता लिहिली आहे.
ब्रह्मदेवाने या पृथ्वीतलावर एक दयाळू हृदयाची तेजस्वी, कीर्तिमान देवी पाठवली.. ती माणसांच्या जगात अजरामर, आदरणीय झाली ..
तिचे नाव अहिल्या..
No comments