* स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात दाखल झालेल्या अत्याचार पीडित जान्हवीचा फ्रेंच परिवाराकडून स्वीकार..* मानवी नात्याला काळीमा फासणारी घटना अह...
*स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात दाखल झालेल्या अत्याचार पीडित जान्हवीचा फ्रेंच परिवाराकडून स्वीकार..*
मानवी नात्याला काळीमा फासणारी घटना
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
जन्मदात्या आईच्या दुर्दैवी निधनानंतर सावत्र आईने केलेले अमानवी वर्तन आणि वडिलांसह सर्वच नातेवाईकांनी जबाबदारी झटकल्याने अवघ्या 8 वर्षांची जान्हवी ( बदललेले नाव ) बेघर आणि अनाथ झाली .स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी अचाट परिश्रमाने तिला स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रात दाखल केले. आज मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी जान्हवी कायदेशीर दत्तक विधानाद्वारे एका उच्चशिक्षित आणि सुप्रसिद्ध फ्रेंच परिवाराचा भाग बनणार आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सचिन वहाडणे आणि डॉ. सौ .सोनाली वहाडणे दांपत्याच्या हस्ते जान्हवीचे दत्तक विधान आयोजण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रात आयोजिण्यात आलेला हा सोहळा सर्वांसाठी खुला आहे.
22 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे विठ्ठल मंदिरात 8 वर्षीची छोटी मुलगी आकांत करीत देवाकडे गाऱ्हाणे करीत होती.ती
जान्हवी होती. मंदिरातून पुजाऱ्याने स्नेहांकुर टीमला तात्काळ ही माहिती दिली.तक्षणी स्नेहांकुरची टीम वायुवेगाने मुलीपर्यंत पोहोचली. जान्हवीच्या चेहऱ्यावर आणि अंगावर जखमा होत्या. तिची माहिती विचारली तर भीतीने तिची दातखिळ बसली आणि तिला चक्कर आली . तिचे दोन दात पडले होते . तिच्या शरीरावर अनेक जखमा दिसत होत्या. स्नेहांकुर टीमने तिची विचारपूस केली .घर ,गाव यांच्या बद्दल माहिती विचारली. भयग्रस्त झालेली ही मुलगी काहीही बोलू शकत नव्हती. परंतु स्नेहांकुर टीमने तिच्या वेदना तात्काळ डॉक्टरांकडे नेऊन कमी केल्या. बाल कल्याण समितीच्या मार्फत जान्हवीला काळजी व संरक्षणासाठी स्नेहांकुर येथे दाखल करण्यात आले.
अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर स्नेहांकुर टीमने तिचे कुटुंब शोधले.त्यावेळी जान्हवीची दुःखद कथा समजली. सख्ख्या आईच्या निधनानंतर वडिलांनी आणलेली सावत्र आई जान्हवीला बेदम मारहाण करायची . त्या रात्री मारहाण करून जान्हवीचे 2 दात आईने पाडले. वडील सर्व तमाशा हतबलपणे पाहत होते.काठीने तिला बेदम मारहाण चालू असतानाच जीव वाचवून जान्हवी घरातून पळाली . अनवाणी आणि रानावनातून रात्रभर चालत ती विठ्ठल मंदिरात पोहोचली.
स्नेहांकुर टीमने तिच्या आई-वडिलांना समजावले की , ही मुलगी जड झाली असेल तर तिचा कायदेशीर परीत्याग करा. कुटुंबाला नकोशा झालेल्या जान्हवीचा ताबा बाल कल्याण समितीने स्नेहांकुर ला दिला.
स्नेहालयच्या नगर औद्योगिक वसाहती मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जान्हवीला दाखल करण्यात आले. शिकण्याची संधी मिळाल्याने जान्हवीने अभ्यासात ,खेळात आणि विविध कलांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.
तिला सुयोग्य दत्तक पालक शोधण्यासाठी प्रयत्न चालू होते.
तथापि तिच्या समोरील पडलेल्या दातांच्या स्थितीमुळे आणि वाढलेल्या वयामुळे भारतीय पालकांनी तिला दत्तक घेण्यास नकार दिला.परंतु फ्रान्समधील एका सहृदय आणि संपन्न जोडप्याने मात्र तिला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली . आंतरराष्ट्रीय दत्तक विधानाची सर्व
कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याने जान्हवीचे पालक तिला फ्रान्सला नेण्यासाठी स्नेहालय मध्ये आले.
आपल्या नव्या कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करताना जान्हवी हरखली आहे.देव तारी त्याला कोण मारी , तसेच होते ते चांगल्यासाठीच... अशा म्हणींवर आता कोणाचाही विश्वास बसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
No comments