आलाबाद ग्रामपंचायतीचा विद्युत मंडळावर आरोप – स्मार्ट पोस्टपेड मीटरला विरोध आलाबाद, प्रतिनिधी साताप्पा कांबळे ता. कागल): आलाबाद गावामध्ये ...
आलाबाद ग्रामपंचायतीचा विद्युत मंडळावर आरोप – स्मार्ट पोस्टपेड मीटरला विरोध
आलाबाद, प्रतिनिधी साताप्पा कांबळे ता. कागल):
आलाबाद गावामध्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्यास सुरुवात केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. ग्रामपंचायतीने स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्यास विरोध दर्शविला असूनही विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 70 ते 75 स्मार्ट पोस्टपेड मीटर गावामध्ये बसविले आहेत. याला ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले की, हे फक्त खराब मीटर बदलण्याचे काम आहे, मात्र प्रत्यक्षात स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्यात आले. यावेळी संग्रामसिंह घोरपडे (कनिष्ठ अभियंता) आणि मितल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मीटरचे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, हे प्रीपेड मीटर नसून पोस्टपेड आहेत आणि ते अधिक चांगले कार्यक्षम आहेत.
मात्र, ग्रामस्थांचा विरोध कायम राहिला. ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, आलाबाद गावामध्ये कोणतेही स्मार्ट मीटर, मग ते प्रीपेड असो वा पोस्टपेड, बसवायचे नाहीत. गावकऱ्यांनी याला एकमुखाने विरोध दर्शवून ग्रामपंचायतीत ठराव मंजूर करण्याचा इशारा दिला.
या बैठकीत संग्रामसिंह घोरपडे (कनिष्ठ अभियंता), मितल कंपनीचे सुपरवायझर संदिप माने, ऑपरेटर किशोर शिंत्रे, वायरमन निखिल ढोणे, उपसरपंच दिनेश मुसळे, माजी उपसरपंच सिध्दापा गौरे, तानाजी कामते, सदस्य मोहन गुरव, माजी सदस्य एकनाथ कामते, संतोष खराडे, शीतल उत्तुरे, सचिन कामते, जगदीश कांबळे, माजी पोलीस संजय चौगुले यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्मार्ट मीटर गावामध्ये बसविण्याच्या निर्णयाचा विरोध केला जाईल, आणि आवश्यक असल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले जाईल.
– आलाबाद, प्रतिनिधी साताप्पा कांबळे
No comments