तारळे खुर्द येथील शेतमजूराच्या मुलाचा फिल्म आर्ट डायरेक्टर म्हणून *रावडी राठोड* ते *छावा* थक्क करणारा प्रवास! कपिलेश्वर प्रतिनिधी, सुभाष ...
तारळे खुर्द येथील
शेतमजूराच्या मुलाचा फिल्म आर्ट डायरेक्टर म्हणून *रावडी राठोड* ते *छावा* थक्क करणारा प्रवास!
कपिलेश्वर प्रतिनिधी, सुभाष गुरव
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा ऐतिहासिक हिंदी चित्रपट देश विदेशातील चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. गेले आठवडाभर चित्रपट सृष्टीत छावा चीच हवा असून या चित्रपटाचे कोल्हापूर कनेक्शन आता समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द या छोट्याशा खेड्यातील दिलीप गणपती रोकडे या तरुणाने या चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले आहे.
तारळे खुर्द येथील गणपती दत्तात्रय रोकडे आणि शांताबाई या भूमिहीन शेतमजूर दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या दिलीप चा हिंदी चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक म्हणून गेल्या बारा वर्षांतील ' *रावडी राठोड* 'ते ' *छावा* ' हा प्रवास थक्क करणारा आहे.
तारळे खुर्द येथे प्राथमिक आणि कसबा तारळे येथील न्यू हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण घेतलेल्या दिलीप ला शालेय वयातच चित्रकलेची आवड होती. शालेय जीवनातच चित्रकलेबरोबर थ्रीडी मॉडेल बनविणे,गणेश उत्सवात तरुण मंडळांच्या विविध कार्यक्रमात कलात्मक सजावट करणे यात दिलीप चा हातखंडा होता. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर दिलीप ने कोल्हापुरात कला निकेतन मध्ये ए टी डी ही पदविका घेतली. मेरिट च्या जोरावर त्याला 2006 मध्ये मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे कोल्हापूर आणि मुंबईत शिकताना त्याने पडेल ती छोटी मोठी कामे केली. कोल्हापुरात कला निकेतन ला शिकत असताना तर महिना सहाशे रुपये पगारावर एका ज्यूसच्या हातगाडी वर पार्ट टाइम नोकरी केली.
2012 मध्ये जे जे स्कुल ऑफ आर्ट मधून डिझायनिंग ची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर गुणवत्तेच्या जोरावर थेट संजय लिला भन्साळी ग्रुपच्या प्रोडक्शन मध्ये दिलीप ला 'रावडी राठोड' या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली.कोल्हापूर मध्ये पार्ट टाईम महिना 600 ची नोकरी केलेल्या दिलीप चा संजय भन्साळी प्रॉडक्शन मध्ये सुरुवातीचा पगार होता महिना 65 हजार रुपये. रावडी राठोड च्या कामाची वाहवा झाल्यानंतर दिलीप ने मागे वळून पाहिलेच नाही . त्यानंतर *रामलीला* , *तनु वेड्स मनू* 2 , *पद्मावत* , *सुपर थर्टी* , *फँटम* , *महाराज* , *तेजस* *भूतनाथ 2* आणि आता *छावा* या चित्रपटांचे कला दिग्दर्शन करण्याची संधी त्याला मिळाली. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासिक खान यांच्या मुळे मोठे मोठे बॅनर मिळाल्याने दिलीप श्री.खान यांच्या विषयी कृतज्ञ आहे.
छावा मधील भव्य दिव्य दृश्यासाठी लागणारी डिझाईन करण्याचे मुख्य काम दिलीपने केले आहे. या यशस्वी चित्रपटाचे मुख्य श्रेय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना आहे असे दिलीप आवर्जून सांगतो.
बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत बारा वर्षे राहून ही दिलीप ची नाळ आपल्या मातीशी नेहमीच जोडलेली आहे. अधून- मधून त्याची गावी ये - जा सुरू असते. पण बॉलीवूडमधील सेलेब्रिटी असल्याचा यत्किंचितही तोरा तो गावात कधी मिरवत नाही. साधेपणाने तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो असे त्याचे मित्र नेताजी चौगले अभिमानाने सांगतात.
लग्न करतानाही बॉलीवूडच्या झगमगत्या भुल- भुलय्यात दिलीप फसला नाही. लग्नासाठी गावाकडील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगीची निवड करा असे त्यांने आई-वडिलांना सांगितले होते . यमगे ता. कागल येथील स्वरा चौगले या शेतकरी कुटुंबातील मुलीशी त्याने लग्न केले आहे . अतिशय गरिबीत दिवस काढून खडतर कष्ट केलेल्या आई-वडिलांनी माझ्यासाठी आणि बहिणीसाठी खूपच कष्ट घेतले, मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच अशी दिलीपची भावना आहे.
मुंबईत सेटल झाल्यानंतर लगेच दिलीप ने आई वडिलांना मुंबईत नेले. पण गावच्या मोकळ्या - ढाकळ्या वातावरणात आयुष्य काढलेल्या त्याच्या आई वडिलांनी मुंबईत सतत न रमता अधे मध्ये गावाकडे येणे जाणे सुरूच ठेवले. दोन वर्षापूर्वी दिलीप च्या आई शांताबाई यांचे गावी असतानाच आकस्मिक निधन झाले.
तारळे खुर्द येथे दिलीपच्या घरी वडील गणपती रोकडे यांची भेट घेतली असता त्यांच्या चर्चेतून दिलीप च्या वाटचालीचे पैलू उलगडले.
दिलीप चे चित्रपट पाहताना पडद्यावर कला दिग्दर्शक दिलीप गणपती रोकडे असे दिलीप चे पूर्ण नाव दिसले की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते,असे सांगत मुलाच्या कर्तुत्वामुळे छाती अभिमानाने भरून येते. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
गावी आयुष्य खडतर गेल्यानंतर आता आमचे चांगले दिवस आले आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी दिलीपच्या आईचे अकस्मित दुःखद निधन झाले, आमच्या चांगल्या दिवसात दिलीप ची आई सोबतीला असणार नाही. याबद्दल गणपती रोकडे यांनी दुःखद खंत व्यक्त केली.
No comments