सातत्यपूर्ण अभ्यासातूनच ज्ञानाची श्रीमंती प्राप्त करता येते माजी प्राचार्य श्री विजय डोणे कोल्हापूर:- कोणत्याही सबबी न सांगता यशाचा ध्यास ...
सातत्यपूर्ण अभ्यासातूनच ज्ञानाची श्रीमंती प्राप्त करता येते
माजी प्राचार्य श्री विजय डोणे
कोल्हापूर:- कोणत्याही सबबी न सांगता यशाचा ध्यास घेऊन जीवनमान उंचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयासक्त बनावे. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकली आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रयत्नाची पराकाष्टा केली तरच जीवनामध्ये यश मिळते. यासाठी विद्यार्थी दशेत सातत्यपूर्ण अभ्यासातूनच ज्ञानाची श्रीमंती प्राप्त करता येते असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्री विजय डोणे यांनी केले.
येथील शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारे जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या करिता शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांशी संवाद साधताना माजी प्राचार्य श्री विजय डोणे बोलत होते. प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यासाठी माजी प्राचार्य श्री विजय डोणे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. पत्रावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बी.पी.माळवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत तसेच प्रा. बी.टी. यादव यांनी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर शैक्षणिक वर्ष २३-२४ मधील १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. देणगीदारांच्या ठेवनिधीतून सदर शिष्यवृत्ती खूप हुशार आणि गरजू अशा विद्यार्थी -विद्यार्थिनीना दिली जाते. माध्यमिक १० व उच्च माध्यमिक कडील १७ शिष्यवृत्तीचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. देणगीदारांची नावे व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची माहितीचे वाचन उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. पत्रावळे यांनी केले.
प्रमुख अतिथी माजी प्राचार्य श्री विजय डोणे यांनी मेन राजारामच्या समृद्ध शिक्षणाची परंपरा सांगत असताना प्रतिकूल परिस्थितीतून अण्णासाहेब लट्टे, खाशाबा जाधव असे गुणवंत विद्यार्थी घडले आहेत.
विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशासाठी अभ्यासात सातत्य,श्रम व समर्पण या त्रिसूत्रीचा आवलंब करण्यास विद्यार्थ्यांना आवाहन करताना सुंदर पीचाई व मायकल जॅक्सन यांची यशोगाथा थोडक्यात सांगितली. प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आजचा विद्यार्थी बुद्धिमान आणि मेहनती असून त्याला योग्य मार्गदर्शन व योग्य दिशेची गरज आहे. ज्ञान व कौशल्याच्या जोरावरतीच विद्यार्थ्यांना आर्थिक प्रगती बरोबर कोणत्याही क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करता येईल. वेगाने विकसित होत असलेल्या जगामध्ये स्वतःच्या प्रगतीचा विद्यार्थ्यांनी ध्यास घेतला पाहिजे असे सांगत त्यांनी प्रशालेच्या गुणवंताप्रती गौरव करुन भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंतांच्या वतीने कु संजना गोळे व कु. आर्या पाटील या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आपल्या यशाचे सर्व श्रेय प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंदाना देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप प्रशालेचे डॉ. संतोष माने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला तर सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक,देणगीदार, प्रतिष्ठित नागरिक व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments